• Wed. Oct 15th, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

ByMirror

Aug 8, 2023

गरजूंवर होणार अल्पदरात शस्त्रक्रिया

आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांचे काळजी घेणारे मातृछत्र बनले -अभिषेक कळमकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या आचार, विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. मातृत्वाच्या भावनेतून मुळाबाळाप्रमाणे रुग्णांची काळजी घेऊन हॉस्पिटल मातृछत्र बनले आहे. सर्वसामान्यांमध्ये मोठा विश्‍वास संपादन करुन आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले असल्याचे प्रतिपादन माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे प्र. शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त स्व. पन्नालालजी धोका स्मृतीप्रित्यर्थ सुर्यकांतजी, शांतीकुमारजी, ईश्‍वरलालजी एवं धोका परिवाराच्या वतीने आयोजित जनरल सर्जरी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी कळमकर बोलत होते. यावेळी डॉ. अजित फुंदे, डॉ. रणजीत सत्रे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहर जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पवार, जनरल सर्जन डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर, संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, बाबुशेठ लोढा, प्रकाश छल्लाणी, मानकशेठ कटारिया, वसंत चोपडा आदींसह धोका परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना कळमकर म्हणाले की, शिबिराबरोबर वर्षभर गरजूंची सेवा या हॉस्पिटलमध्ये घडत आहे. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वैयक्तिक लक्ष देऊन रुग्णांची काळजी घेतली जाते. प्रत्येक आजाराचे निदान व शस्त्रक्रिया एका छताखाली उपलब्ध झाल्याने याचा देखील फायदा सर्वसामान्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजींचे रुग्णसेवेचे स्वप्न हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. या सेवा कार्यात धोका परिवाराचे नेहमीच योगदान मिळत आहे. मनापासून करण्याची इच्छा असल्यास सर्व काही घडते. चांगल्या भावनेने सर्व एकत्र आल्यास चांगले काम उभे रहाते. मोठ्या विश्‍वासाने सर्वसामान्य वर्ग आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येत असून, त्याच्या व्याधी दूर करण्याचे काम केले जात आहे. तर हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध सेवेची त्यांनी माहिती दिली.
सूर्यकांत धोका म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोठ्या श्रद्धेने रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. कृतार्थ व सेवाभावाने आरोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सातत्याने भर पडत आहे. या कार्यास धोका परिवाराचे नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. रणजीत सत्रे यांनी विज्ञान व अध्यात्मिकतेची जोड या हॉस्पिटलमध्ये पहावयास मिळते. आचार्यजींचे आशीर्वाद व उपचाराने रुग्ण बरे होत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या बाबींचा उलगडा केला. डॉ. अजित फुंदे म्हणाले की, निष्काम सेवा कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून उभे राहिले आहे. तर आनंदऋषीजी मेडिकल कॉलेजची पायाभरणी होत असताना, या कॉलेजमध्ये गोरगरिबांची मुले शिकून डॉक्टर होऊन पुढे समाजाची सेवा करणार आहे. हे सेवा कार्य अविरत पुढे सुरू राहणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नामदेव पवार यांनी हॉस्पिटल स्थापनेपासून आजपर्यंतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.


या शिबिरात जनरल सर्जन डॉ. प्रवीण मुनोत व डॉ. विवेक भापकर 85 रुग्णांची मोफत तपासणी केली. तर गरजूंवर अपेंडिक्स, इगवायनल हर्निया, हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *