शेतकरी, कामगार व बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणार -आशाताई गवळी
21 शाखांचा शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार व बेरोजगार युवकांच्या प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. शहरातील पाण्याचा, खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न, युवकांचे होणारे खून व वादग्रस्त वातावरणाचे फक्त राजकारण सुरु असून, या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी युवकांना संघटित करुन कार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी केले.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी गवळी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे, मेजर रावसाहेब काळे, ॲड. महेश शिंदे, तनिज शेख, दत्ताभाऊ वामन, सुरेखा सांगळे, डॉ. संतोष गिन्हे, मिरीच्या सरपंच सुनंदा गवळी, वंदना वनारसे, डॉ. जयश्री नरवडे, वैशाली चुंबळकर, पुनम पतंगे, मंदाताई हापसे, माजी सरपंच संतोष शिंदे, एकनाथ मीरपगार, चेअरमन राजेश होंडे पाटील, अशोक गोरे, अक्षय वनारसे, गणेश खोमणे, नागेश खोमणे, अनिता वेताळ, सुरज धनवटे, दत्ता धनवटे, अमोल घोरपडे, सागर धनवटे, महेश झाडे, ऋषिकेश गवळी, अक्षय गवळी, ऋषिकेश गीते, चेतन झाडे, चेतन शेळके, महेश केरकळ, उमेश कोरडे, भागिनाथ गवळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना गवळी म्हणाल्या की, मागील पंचवीस वर्षापासून संघटना समाजकार्य करीत आहे. पूर्वीची कार्यकारणी बरखास्त करुन काम करणाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. पक्षाशी एकनिष्ठा व कर्तव्याची जाणीव ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे. निवडणूक हा मुद्दा गौण असून, संघटना मोठी करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर भविष्यात निवडणुकीला देखील सामोरे जावून समाजकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आशाताई गवळी या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तर पाथर्डीतील विविध गावात तब्बल 21 शाखांचे शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक युवक, महिला व ग्रामस्थांनी अखिल भारतीय सेनेत प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे म्हणाले की, पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाजकार्याने युवा वर्ग पक्षाला जोडला जात आहे. इतर पक्षांनी युवकांना फक्त राजकारणापुरतं वापरले, मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यात आलेले नाही.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र करून व्यवस्थे विरोधात आवाज उठविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवक संघटित करुन पक्ष बळकट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब काळे पाटील म्हणाले की, शहरातील प्रमुख प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. फक्त आपले व कार्यकर्त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी सत्ता राबवली जात आहे. समाजातील प्रमुख प्रश्नांना बगल देण्यासाठी इतर जातीय मुद्दे उपस्थित केले जात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक व कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. आभार राजेंद्र होंडे यांनी मानले.