• Thu. Oct 16th, 2025

श्रावण अधिक मासनिमित्त महिलांना आरोग्यासाठी योग-प्राणायामचे धडे देऊन रंगला मंगळगौरीचा खेळ

ByMirror

Aug 6, 2023

प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम

आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते – प्रकाश इवळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने श्रावण अधिक मासनिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी योग-प्राणायम मार्गदर्शन व्याख्यान व मंगळगौरी खेळचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांना सदृढ व निरोगी आरोग्यासाठी आहार, योगाचे मार्गदर्शन करण्यात आले. तर मंगळगौरीच्या खेळात महिलांनी विविध प्रकारच्या फुगड्यांसह दोन-तीन प्रकाराचा झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, भोवर भेंडी, अडवळ घूम, पडवळ घूम, गोफ असे मजेदार व प्रसंगी मिश्‍कील खेळाचा आनंद लुटला.


या कार्यक्रमासाठी योग शिक्षक प्रकाश इवळे, गीता गिल्डा, जयाताई गायकवाड, प्रिया भिंगारदिवे, विद्या बडवे, छाया राजपूत, सुरेखा भोसले, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, वंदना गारुडकर, कुसुम सिंग, सविता गांधी, ज्योती कानडे, जयश्री पुरोहित, उज्वला बोगावत, साधना भळगट, प्रतिभा भिसे, उषा सोनी, ज्योत्स्ना कुलकर्णी, हिरा शहापुरे, स्वाती गुंदेचा, सुजाता पुजारी, शशिकला झरेकर, उषा गुगळे, मेघना मुनोत आदी उपस्थित होते.


योग शिक्षक प्रकाश इवळे म्हणाले की, आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी योगाचा स्विकार करण्याची गरज आहे. कुटुंबाचा कारभार पहाणारी गृहिणीने आपल्या आरोग्य व आहार विषयी जागृक होण्याची गरज आहे. ऋषीमुनींच्या तपसाधनेतून योग, प्राणायाम व आयुर्वेद शास्त्र मानव जातीच्या कल्याणासाठी पुढे आले. हा ठेवा भारताने जगाला संपूर्ण जगाला दिला. पाश्‍चात्य संस्कृतीच्या आहार व जीवन पध्दतीने भारतीयांचे आरोग्य बिघडले असून, निरोगी व आनंदी जीवनासाठी योग-प्राणायाम करुन आपल्या संस्कृतीचा स्विकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर इवळे यांनी आरोग्यासाठी उपयुक्त आदर्श आसने करून ओमकाराचे महत्त्व विशद केले. तसेच सकस व योग्य आहाराची माहिती दिली.


कार्यक्रमाची सुरुवात ज्योती विधाते यांनी ओमकारने केली. राधिका मंगळागौरी ग्रुपने मंगळगौरी खेळचा बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. या ग्रुपच्या महिला पारंपारिक वेशभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. रंगलेल्या या खेळात सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.


प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांना विरंगुळा मिळावा या भावनेने विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांसाठी मेघना मुनोत यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या. यामध्ये सुप्रिया औटी, सोनाली मुथा, स्वाती नागोरी, दिपाली लखारा, जयश्री लुनिया, संगीता गांधी, कल्पना कटारिया, अलका पोखरणा, रेखा मुथियान यांनी बक्षीस पटकाविली. विजेत्या महिलांना चंदूकाका सराफ (बारामती) यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बडवे यांनी केले. आभार ज्योती कानडे यांनी मानले. सर्व महिलांसाठी जयाताई गायकवाड यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *