• Fri. Mar 14th, 2025

भाजपला साथ सर्व गुन्हे माफ, या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने केला तीव्र निषेध

ByMirror

Jul 3, 2023

जनविरोधी भाजप सरकार सत्तेतून खाली खेचा

महाराष्ट्र वाचवा भाकप राज्यभर मोहीम राबवणार, राज्य कार्यकार्यकारणीच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवण्यासाठी दुसरा पक्ष फोडून अभद्र युती केली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नैतिकतेच्या गप्पा मारणारे भाजप कोणत्या थराला जाऊ शकतात हे जनतेने रविवारच्या (2 जुलै) घडमोडीने पाहिले असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीतून सत्ता टिकवण्याच्या झालेल्या घडामोडीनंतर महाराष्ट्र राज्य कार्यकार्यकारणीची ऑनलाईन पध्दतीने बैठक पार पडली. भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ.डॉ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, सहसेक्रेटरी कॉ.प्रा. राम बाहेती, कॉ. राजू देसले, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. नामदेवराव चव्हाण, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. सुकुमार दामले, राजन क्षीरसागर, कॉ. शाम काळे, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. लता भिसे, कॉ. हिरालाल परदेशी, कॉ. महादेव खुडे, कॉ. हौसलाल राहांगडाले, कॉ. अरविंद जक्का, कॉ. अशोक सोनारकर, सी.एन. देशमुख, कॉ. अशोक सुर्यवंशी आदी कार्यकारणी सदस्य सहभागी झाले होते.
अगोदर शिवसेना फोडून सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र फुटीरापैकी 16 आमदार अपात्र ठरणार असल्याने सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजपने फूट पाडली आहे. ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्री पद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची ऐसी तैसी केल्याचा सूर या बैठकीत उमटला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण नियंत्रण असलेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे केंद्रातील सरकार हटविण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष, इतर डावे, पुरोगामी पक्ष तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सह धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न पाटणा येथील बैठकीत झाले. अजित पवारांनी केलेली गद्दारी या प्रयत्नांना छेद देणारी व घातक ठरते. आपल्या भ्रष्ट आर्थिक घोटाळ्यावर पांघरून घालण्यासाठी ईडीच्या भीतीपोटी भाजपच्या तंबूत शिरणार्‍या या आमदारांचा निषेध करुन त्यांना जनतेच्या दरबारात उघडे करण्याचा संकल्प करण्यात आला.


राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींची विस्तृत माहिती देताना म्हणाले की, हिमाचल प्रदेश नंतर कर्नाटकविधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेली दारूण पराभव, मणिपूर मध्ये संघ- भाजप सरकारविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून पेटलेली दंगल, बिहार येथे नुकत्याच झालेल्या 15 राजकीय पक्षांच्या बैठकीत जनविरोधी, धर्मांध भाजप सरकार विरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करण्याचा व भाजपला सक्षम पर्याय तयार करण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील संघ भाजपचे केंद्र सरकार बिथरले आहे. चिडलेल्या नरेंद्र मोदीनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे सांगून भाजपसोबत या नाही तर कारवाईला सामोरे जा अशी एक प्रकारे धमकीच दिली होती. दोन दिवसांतच अजित पवार काही लोकांना घेऊन भाजपला शरण गेल्याचे त्यांनी सांगितले.


कॉ. प्रकाश रेड्डी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना मंत्रीपदे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. भाजपला साथ सर्व गुन्हे माफ अशी परिस्थिती निर्माण करणार्‍या व जनतेच्या मुलभूत प्रश्‍नांकडे डोळेझाक करणार्‍या अकार्यक्षम सरकारला सत्तेतून खाली खेचा व महाराष्ट्र वाचवा अशी मोहीम भाकप राज्यभर राबविणार आहे. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर जनताच मात करेल व व या धर्मांध, भ्रष्ट सरकारला धडा शिकवेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या सर्व प्रकारामुळे राज्यातील जनतेचे मूलभूत प्रश्‍न गंभीर होत आहेत. सर्वसामान्य जनता प्रचंड नाराज आहे असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. तर शिंदे-फडणवीस -पवार सरकार तोडफोडीचे भ्रष्ट युतीचे सरकार असून राजीनामा देऊन ताबडतोब निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणीही भाकपने बैठकीतून केली.

28 ते 30 जुलैला राज्य कौन्सिलची तातडीची बैठक

कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 28 ते 30 जुलै दरम्यान भाकपच्या राज्य कौन्सिलची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील गायरान जमीन धारकांना जमीनीतून हुसकावून लावण्याचे व कार्पोरेट घराण्यांना त्या जमिनी देण्याचे षडयंत्र, शेतकर्‍यांचा थकीत पीकविमा व नुकसान भरपाई, बोगस खते व बियाणे, शिक्षणाची झालेली हेळसांड, शिक्षक व प्राध्यापकांच्या हजारो रिक्त जागा, वाढती बेरोजगारी व महागाई, तिरंगा झेंड्याला व संविधानाला मानू नका अशी संभाजी भिडे सारख्या कडून उघडपणे केली जाणारी आवाहने, वाढलेले जातीय अत्याचार व धार्मिक ध्रुवीकरण याविरोधात भाकप राज्यभर आंदोलन करण्याचाही निर्णय या बैठकीतून होणार आहे. या मूलभूत प्रश्‍नापासून फारकत घेणार्‍या शिंदे-फडणवीस-पवार सरकारपासून महाराष्ट्र वाचवा अशी हाक भाकपने जनतेला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *