चौदा व अकरा वर्षाखालील वयोगटाच्या खेळाडूंनी पटकाविले विजेतेपद
तर एम स्पोर्ट्स अकॅडमीला सांघिक द्वितीय क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटर क्लब स्टेट लेवल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील एम स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन चौदा व अकरा वर्षाखालील वयोगटात विजेतेपद पटकाविले. स्पीड व्हील स्केटिंग क्लब व द फिटनेस फायटर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी युनिटी कप 2023 चे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथील कै.सौ. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सलग तीन दिवस ही स्पर्धा रंगली होती. यामध्ये महाराष्ट्रातील पाचशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शहरातील ऐम स्पोर्ट्स अकॅडमीचे चौदा वर्षाखालील वयोगटात ईशांत गर्जे (कर्णधार), आयुष पगारे, सोहन गीत खाने, कार्तिक बनकर तर अकरा वर्षाखालील वयोगटात भावेश वाघ (कर्णधार), आर्यन गुगळे, इधांत जुनागडे, अंशुमन पगारे, दर्शन पाटील, राजवीर जगताप यांनी लक्षवेधी खेळ करुन विजेतेपद पटकाविले. तर अकॅडमीला अनुक्रमे सांघिक तृतीय व द्वितीय क्रमांक मिळाले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अकॅडमीला चषक व 4 हजार रुपयाचे रोख बक्षिस देण्यात आले.
तर विजेत्या स्पर्धकांना मेडल आणि भेटवस्तू देण्यात आल्या. खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक शुभम कर्पे, प्रमोद डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रियदर्शनी स्कूलचे चेअरमन बाळासाहेब खोमणे यांनी विजेते खेळाडू व अकॅडमीला या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.