• Mon. Jan 26th, 2026

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देणार -धम्मज्योती गजभिये

ByMirror

Jun 25, 2023

चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांचे आश्‍वासन

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन दिले महामंडळाच्या प्रश्‍नांचे निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देऊन, तळागळातील समाजाचा महामंडळाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन नुकतेच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झालेले धम्मज्योती गजभिये यांनी दिले. तर महामंडळाचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी महामंडळ ऑनलाईन होण्याच्या दिशेने कामास सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.


चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची भेट घेऊन महामंडळाशी निगडीत विविध प्रश्‍नांचे त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजभिये यांनी शिष्टमंडळास आश्‍वासित केले. याप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे, मधुकर घनदाट उपस्थित होते.


महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल गजभिये यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. चर्मकार विकास महामंडळाची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने समाज विकासाच्या कल्याणकारी योजनांपासून लांब राहिला. दलालांचा वावर, कार्यालय भाडे व फक्त कर्मचारी पोसण्यापुरते हे महामंडळ राहिले होते. मात्र प्रामाणिकपणे समाजाची सेवाभावाने काम करणारे गजभिये यांची महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याने समाजाच्या आशा पल्लवीत झाली असल्याची भावना संजय खामकर यांनी व्यक्त केली. सुभाष मराठे यांनी समाजाला न्याय मिळण्यासाठी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात चर्मकार विकास संघ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट केले.


मधुकर घनदाट यांनी समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचणे आवश्यक आहे. महामंडळ फक्त नावाला न राहता त्याचे कार्य दिसण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी शिष्टमंडळाने गजभिये यांच्या समवेत महामंडळाशी निगडीत प्रश्‍नांची सविस्तर चर्चा केली. तर चर्मोद्योग महामंडळाचे सर्व कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी देखील करण्यात आली.


या बैठकीत एनएसएफडीसी ला महाराष्ट्र शासनाने हमी दिल्याने 22 कोटी निधी उपलब्ध झाला असून, आणखी 18 कोटी निधी मंजूर झाला आहे. निधी उपलब्ध झाल्याने कर्ज वितरण करण्यात येणार आहे. शासनाने महामंडळात एक हजार कोटी भाग भांडवल गुतंविल्याने टप्प्या टप्याने शासनस्तरावर निधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात सहा विभागात क्लस्टर तयार करुन व जागतिक स्तराचे प्रशिक्षण युवकांना देऊन रोजगाराची संधी मिळणार आहे. देवणार (मुंबई) येथील दोन एकर जागेत जागतिक दर्जाचे क्लस्टर-प्रशिक्षण केंद्र निवासाच्या सोयीसह विक्री व्यवस्थेकरिता जागतिक दर्जाचे आधुनिक मार्केट करण्याचा चर्मकार विकास संघाचा प्रस्ताव विचारधीन असून लवकर कामाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक लेदर इंडस्ट्री व उद्योगांचा व्यवसाय वाढीसाठी व व्यवसायास चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, महामंडळाची कर्ज मर्यादा 15 लाख वाढवून संपूर्ण कर्ज महामंडळाच्या माध्यमातून मिळण्यासाठी व कर्जाच्या जाचक अटी शिथील करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *