गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ब्रिद घेऊन शाळेची वाटचाल -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवारात रांगोळी सडा टाकून प्रवेशद्वार फुग्यांनी सजविण्यात आले होते. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, माजी नगरसेविका शारदा ढवण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा योगिता वाघमारे, अहिल्याबाई सांगळे आदींसह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधून, उपक्रमशीलपणे ज्ञान दान केले जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ब्रिद घेऊन शाळेची वाटचाल सुरु आहे. हसत-खेळत शिक्षणाचे धडे देऊन विद्यार्थ्यांना गुणसंपन्न केले जात असताना परिसरातील नागरिकांचा जिल्हा परिषद शाळेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आवारे यांनी केले. आभार सुरेखा वाघ यांनी मानले.