शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा
दहावी व बारावी बोर्डातील विद्यार्थ्यांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय विद्यालय व प्रा.बत्तीन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे बॅण्ड पथकासह गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या आवारात रांगोळी काढून, फुग्यांची सजावट करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र (राजू) म्याना, विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिंदम, उपमुख्याध्यापक पांडुरंग गोणे, पर्यवेक्षक प्रमोद चन्ना, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, शिक्षक प्रतिनिधी भानुदास बेरड, ग्रंथपाल विष्णू रंगा, शिक्षकेतर प्रतिनिधी निलेश आनंदास आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पद्मशाली युवा ट्रस्टच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

बाळकृष्ण सिद्दम यांनी शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन त्याची प्रगती होते. परिस्थिती बदलण्याची शक्ती शिक्षणात असून, श्रमिक कष्टकर्यांच्या मुलांनी उच्च शिक्षाणे आपला उत्कर्ष साधण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक संदीप छिंदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.