ठिकठिकाणी जातीय तणाव निर्माण होत असताना शहरात धार्मिक ऐक्याचे दर्शन
हुंडेकरी यांनी धार्मिक एकतेचे घडविलेले दर्शन शहराच्या एकात्मतेला ऊर्जा देणारे -आ. संग्राम जगताप
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक ऐक्याला ग्रहण लागत असताना ठिकठिकाणाहून जातीय दंगलीच्या घटना पुढे येत आहे. मोर्चे, आंदोलनातील भडकाऊ भाषण व समाज माध्यमांवर तेढ निर्माण करणारे संदेश पसरविल्याने जातीय तणावाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत असताना अहमदनगर शहरात धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविणारे एक आगळे-वेगळे चित्र पहावयास मिळाले. मुस्लिम समाजातील हाजी करीमशेठ हुंडेकरी यांनी नाशिकहून पंढरपूरला सायकलवर जाणार्या हिंदू वारकरींचे मनोभावे स्वागत केले.
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर सायकल वारी काढण्यात येते. ही सायकल दिंडी सुरु झाल्यापासून हुंडेकरी परिवाराच्या वतीने दरवर्षी स्वागत केले जात असून, स्वागत करण्याचे हे त्यांचे तब्बल अकरावे वर्ष आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीत सुमारे तीनशे पेक्षा जास्त युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी असतात. दरवर्षी हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुले ठेवले जाते. या सोहळ्यासाठी लग्नाची तारीख देखील घेतली जात नाही, तर तो दिवस फक्त या वारकरींसाठी राखीव ठेवला जातो. या वारीचा पहिला मुक्काम शहरातील हुंडेकरी लॉन मध्ये असतो. यामध्ये सर्व सायकलपटू वारकरींच्या राहण्यापासून ते नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते.

शहरात आगमन झालेल्या या सायकल वारीच्या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, हाजी करीमशेठ हुंडेकरी, अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे गौरव फिरोदिया, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, नरेशकुमार गवई, मधुसूदन सारडा, डॉ. मनिषा सौंदाळ, आकाश पटवेकर, अमोल गाडे, सतीश बारस्कर, अजिंक्य बोरकर, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर आदींसह वारीत सहभागी झालेले सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल पथकाच्या निनादात या वारीचे स्वागत करण्यात आले. सायकलीवर प्रदुषण मुक्ती, पर्यावरण रक्षण व निरोगी आरोग्याचे संदेश देणारे फलक लावण्यात आलेले होते. वारीत रथामध्ये असलेली पांडूरंगाची पूर्ण कृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधले. एकामागे एक मोठ्या शिस्तीत या वारी शहरात दाखल झाली होती.

प्रास्ताविकात किशोर माने यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा प्रचार प्रसार करीत दरवर्षी या सायकलवारीच्या आयोजन केले जाते. हुंडेकरी यांनी नेहमीच सर्वधर्म समभाव जोपासत मागील अकरा वर्षापासून या वारीतील वारकर्यांची सेवा केली आहे. पंढरपूरला जाताना विविध भागातून सायकलपटू या वारीत जोडले जाणार असून, तर विविध ठिकाणाहून पंढरपूरला सायकलने आलेल्या साडेतीन हजार सायकलिस्ट रिंगण सोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मनीषा सौंदाळ म्हणाल्या की, पहिल्या वारीची मी साक्षीदार असून, आठ व्यक्तींपासून सुरू झालेल्या या वारीत तानेशेपेक्षा जास्त सदस्य जोडले गेले आहेत. महिलांचा सहभाग देखील वाढत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
करीमशेठ हुंडेकरी म्हणाले की, वारकरी दारात आले हे मोठे नशीब आहे. मानवसेवा हा मोठा धर्म असून, दरवर्षी ही सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर या वारीचा प्रवास सुखरुप होण्यासाठी त्यांनी दुआ देखील केली.
संग्राम जगताप म्हणाले की, विविध ठिकाणाहून पंढरपूरला सायकलवारी सुरू झाल्या आहेत. सर्व महाराष्ट्रातील सायकलपटूंनी एकाच वेळेस विविध ठिकाणाहून पंढरपूरला एकत्र आल्यास संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाणार आहे. पर्यावरण रक्षण व आरोग्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचून, लाखोंच्या संख्येने आलेल्या सायकलपटूंचा रिंगण सोहळा नक्कीच आनंद देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर हुंडेकरी यांनी धार्मिक एकतेचे घडविलेले दर्शन शहराच्या एकात्मतेला ऊर्जा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय कसबेकर यांनी केले. आभार हाजी आलिमशेठ हुंडेकरी यांनी मानले.
सायकल वारीत अंधांचा देखील समावेश
मुंबई येथील आठ अंध व्यक्ती आपल्या सहाय्यकासह नाशिक येथून सायकल वारीत सहभागी झाल्या आहेत. त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. सहाय्यक सायकलच्या पुढील सिटवर तर अंध व्यक्ती सायकलच्या मागे बसून पॅडल मारीत पंढरपूर गाठतात. डोळे नसले तरी, हा अद्भूत व आनंद देणारे क्षण ते अनुभवतात.