खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शहरात विविध खेळाला चालना देण्याचे कार्य -आ. संग्राम जगताप
आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल आनंद आप्पासाहेब नलगे या खेळाडूचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुभाष कडलग, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब नलगे, आप्पासाहेब शिंदे, भास्कर कराळे, महेंद्र हिंगे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, संजय चोपडा आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शहरात विविध खेळाला चालना देण्याचे कार्य केले जात आहे. खेळाचे महत्त्व वाढत असताना ग्रामीण भागातील विविध खेळातील खेळाडू पुढे येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकत असून, ही शहरासह जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह बाब असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे व आप्पासाहेब शिंदे यांनी आनंद नलगे याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आनंद नलगे याने नाशिक येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. रामेश्वर विद्यालय चिखली (ता. श्रीगोंदा) येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आप्पासाहेब नलगे यांचा तो मुलगा आहे. त्याने राष्ट्रीय व राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत अनेक पदक पटकाविली आहेत. आनंद हा शिरुर येथील युनिक शूटिंग अकॅडमीचे संदीप तरटे व शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तर शिवराज ससे यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण घेत आहे.