वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयात सवंगडी 1983 स्नेह मेळावा उत्साहात
1983 च्या दहावीच्या बॅचचे मित्र-मैत्रिण एकवटले
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या वांबोरी (ता. नगर) येथील महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सन 1983 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा सवंगडी 1983 स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी तब्बल 39 वर्षानंतर एकत्र आले होते. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर उतार वयात एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेह मेळाव्यात निधन झालेल्या आपल्या गुरुवर्यांना श्रध्दांजली वाहून हयात असलेल्या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. एवढ्या वर्षानंतर एकत्र आलेल्या गुरु-शिष्यांच्या भेटीने अनेकांचे डोळे पाणावले. या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले वसंतराव दळवी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या आठवणी सांगितल्या.
अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचच्या लिलाबाई बाबूराव दळवी-क्षीरसागर या दिवंगत माजी अध्यापिका यांच्या आठवणी सांगितल्या. हिंदी विषय शिकविणार्या क्षीरसागर मॅडम 2010 रोजी सेवानिवृत्त झाल्या, त्यांचा 14 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले. शाळेत हिंदी व इंग्रजी विषयात प्रथम येणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्या एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक देत होत्या. त्यांनी नेहमीच गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या स्नेह मेळाव्यातील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हा बँक वांबोरी शाखेचे व्यवस्थापक बाबूराव दळवी यांनी केले. वयाचे 54 ते 55 वर्ष ओलांडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सकाळी शाळेला भेट देऊन आपल्या शालेय जीवनात रममाण झाले होते. या मेळाव्यासाठी कामानिमित्त इतर शहरात गेलेले विद्यार्थी व विवाह होऊन गेलेल्या माजी विद्यार्थीनी महाराष्ट्रभरातून एकवटल्या होत्या.
शाळेची घंटा वाजवून उपस्थितांना शाळा भरल्याच्या जुन्या आठवणीत नेले. उपस्थित गुरुजन व मित्र-मैत्रिणींनी प्रार्थना म्हंटली. शाळा सुटल्याची घंटा वाजवताच उपस्थितांनी शाळा सुटल्याचा आनंद लुटला. तर यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.