महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन
देयके तात्काळ निकाली काढण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत वेतनाची देयके व वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके तात्काळ निकाली काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षकांना दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

वेतन पथक कार्यालयात थकीत वेतनाची देयके, रजा रोखीकरणाची देयके, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके, सातव्या वेतन आयोगाच्या थक बाकीची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. काही देयके शाळांना परत करण्यात आली आहेत.
सदर सर्व प्रलंबित देयके निकाली काढण्याच्या दृष्टीने नियोजन करणे अत्यावश्यक आहे. याकरिता सर्व संबंधित शाळांना सुचित करून देयके सादर करण्यात बाध्य करणे व कार्यालयात सादर करण्यात आलेली देयके तात्काळ तपासून आवश्यकता असल्यास प्रशासकीय मान्यते करिता पाठविण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
ही सर्व देयके देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करून 31 मार्च पूर्वी सर्व देयके निकाली काढण्यासाठी त्या दृष्टीने योग्य नियोजन करून संबंधित शाळांना कळविण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तर यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही याची योग्य ती दखल घेण्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी म्हंटले आहे.
