महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
शालेय शिक्षण व शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद संचालकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- 2023 या वर्षासाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे व संघटन मंत्री सुहास हिर्लेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद संचालकांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी 2021 ला प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण 2022 ला पूर्ण झालेले आहे. परंतु मागील दीड वर्षांमध्ये अनेक शिक्षकांनी 12 व 24 वर्षे सेवा पूर्ण केलेली आहे, मात्र या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे ते प्रशिक्षणापासून वंचित आहेत. मागील वर्षी आयोजित प्रशिक्षणासाठी नोंदणी करूनही काही तांत्रिक व वैयक्तिक अडचणीमुळे काही शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे अशा शिक्षकांसाठी व नव्याने शैक्षणिक अहर्ता पूर्ण झालेल्या 12 व 24 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 किंवा 1 जून ते 20 जून 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण आयोजित करावे. मे महिन्याच्या कालावधीत सुट्टी असल्याने बरेचसे शिक्षक आपल्या मूळ गावी किंवा परराज्यात अथवा अन्य ठिकाणी जातात. त्यामुळे शिक्षकांना इंटरनेटची समस्या निर्माण होत असते.
त्यामुळे संबधीत शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर सोय करावी व प्रशिक्षण कालावधी जाहीर करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.