पदोन्नती घेणार्या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
रिपाई ओबीसी सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन 2020 मध्ये पदोन्नती घेणार्या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. यावेळी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, आदिल शेख, संदीप वाघचौरे, प्रकाश भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
रिपाई ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला 2020 च्या अपंग पदोन्नतीची शारीरिक तपासणी करण्याची वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. सदर पदोन्नती घेतलेले काही व्यक्ती हे शारीरिक दृष्ट्या सक्षम असून, त्यांनी दिव्यांगांच्या योजनांचा फायदा घेतलेला आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील चौकशी होत नसल्याने, जाणून-बुजून हे प्रकरण दडपण्याचे काम प्रशासनाच्या वतीने केले जात असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणात खर्या दिव्यांगांवर अन्याय झाला असून, शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तींनी पदोन्नतीचा लाभ घेऊन े शासनाची मोठी फसवणूक केली आहे. तर यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सन 2020 मधील सर्वच अपंगांची शारीरिक तपासणी करुन, यामध्ये अपंग नसताना खोटे दाखले घेऊन लाभ घेणार्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 14 मार्च पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
2020 मध्ये अनेक शिक्षकांनी खोटे अपंगप्रमाणपत्र सादर करुन पदोन्नती घेतलेली आहे. याप्रकरणात सर्वांची शारीरिक तपासणी केल्यास खरे व खोट्यांचा पर्दाफाश होणार आहे. अपंगांवर अन्याय होऊ न देता, खोट्या अपंगांवर कारवाई करण्याची रिपाई ओबीसी सेलची मागणी आहे. खर्या अपंगांवर अन्याय होत असल्यास रिपाईच्या माध्यमातून जनआंदोलन उभे केले जाणार आहे. -विजय शिरसाठ (शहर जिल्हाध्यक्ष, रिपाई ओबीसी सेल)
