आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वात मोठे व अद्यावत विभाग -महावीर बडजाते
नगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे. हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग हे जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वात मोठे व अद्यावत विभाग म्हणून नावरुपास आले आहे. महिन्याला हजारो डायलेसिस रुग्णांना निशुल्क सेवा देण्याचे काम केले जात आहे. कृतार्थ व सेवाभावाने आरोग्य सेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत आरोग्याच्या सुविधा मिळत आहे. या सेवाकार्यात योगदान देताना समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन महावीर बडजाते यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये महावीर फूड प्रॉडक्ट्सच्या वतीने बडजाते व चुडीवाल परिवाराच्या वतीने आयोजित मोफत किडनी विकार तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महावीर बडजाते बोलत होते. याप्रसंगी अशोक चुडीवाल, अक्षर बडजाते, डॉ. प्रकाश कांकरिया, मानकचंद कटारिया, अनिल मेहेर, डॉ. आशिष भंडारी, तज्ञ डॉ. गोविंद कासट, डॉ. प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, आरोग्य सेवेचे लावलेले रोपटे वटवृक्षाप्रमाणे बहरले आहे. या वटवृक्षाच्या छायेत अनेक गरजूंना आधार मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येत असून, एका छताखाली सर्व प्रकारची आरोग्य सेवा दिली जात आहे. कत्तल खाण्याचे आरक्षण असलेल्या या जागेचे परिवर्तन होऊन जीवन देणारे आरोग्य मंदिर बनले. आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये मोठ्या शहराच्या धर्तीवर आरोग्य सेवा दिली जात आहे. तसेच भावी पिढीच्या भवितव्यासाठी भगवान महावीर युनिव्हर्सिटीचे शैक्षणिक प्रकल्प वेगाने उभे राहत असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. गोविंद कासट म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वात मोठे व अद्यावत तंत्रज्ञानानेयुक्त असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग आहे. डायलेसिससाठी वापरले जाणारे आरओ वॉटर, उच्च दर्जाचे मशीन व अद्यावत तंत्रज्ञान रुग्णांना जीवनदायी ठरत आहे. दर महिन्याला दोन हजार पेक्षा अधिक व वर्षाला 27 हजार डायलेसिस सुरु आहे. मागील 5 वर्षात सव्वा लाखाच्या पुढे रुग्णांचे आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत डायलेसिस करण्यात आले आहे. कावीळ झालेल्या रुग्णांच्या डायलेसिससाठी वेगळे मशीन उपलब्ध असून, तब्बल 32 जर्मन कंपनीचे मशीन व अद्यावत फिल्टरींग युनिटच्या माध्यमातून सेवा दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शिबिरात 150 रुग्णांची मोफत किडनी विकार संबंधी विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून रुग्ण आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार अनिल मेहेर यांनी मानले.
लवकरच आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण सुरु करण्याचा मानस
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाचे मशीन, अद्यावत तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सेवी दिली जात असताना गरजू रुग्णांची गरज ओळखून लवकरच हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण सुरु करण्याचा मानस डॉक्टरांसह संचालकांनी व्यक्त केला आहे. यामुळे रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नसून, या आरोग्य मंदिरात ही सेवा देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.