• Sat. Mar 15th, 2025

14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी

ByMirror

Mar 6, 2023

सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले नियोजन

संपाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने 14 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर संपाच्या नियोजनासाठी सिंचन भवन येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यालयात सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या नेत्यांची बैठक पार पडली.


या बैठकीत सर्व शिक्षक, शिक्षकेतर व सरकारी, निमसरकारी कर्मचारी पूर्ण ताकतीने संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करुन संपाचे नियोजन करण्यात आले. तर संपाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, राजेंद्र खेडकर, महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे, पी.डी. कोळपकर, विजय काकडे, शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, सुरेश जेठे, निवृत्ती इले, दगडू मोरे, एम.बी पुंड, बी.व्ही तोरमल, एस.बी. काळे आदी उपस्थित होते.


रावसाहेब निमसे म्हणाले की, शासनाने जास्त वेळ सरकारी कर्मचारी, शिक्षक यांची प्रश्‍ने प्रलंबीत न ठेवता मार्ग काढण्याची गरज होती. त्यांचे प्रश्‍न व मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी, शिक्षकांच्या मनात असंतोष धगधगता आहे. अन्यायग्रस्त कर्मचारी, शिक्षक नाईलाजाने शासनाविरुद्ध संघर्ष उभा उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अप्पासाहेब शिंदे म्हणाले की, शिक्षक हा घटक शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून शासनाच्या विविध कामांमध्ये सहकार्य करत असतो. मात्र या वर्गाचे जिव्हाळ्याचे प्रश्‍न आजही मोठ्या प्रमाणात प्रलंबीत आहे. जुनी पेन्शनसह इतर मागण्यांबाबत ठोस कार्यवाही होत नसून, शासन वेळकाढूपणा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी इतर प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या बैठकीत शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तालुका पातळीवर हा संप यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 14 मार्च रोजी तालुका पातळीवर सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सकाळी 10:30 वाजता तहसिल कार्यालया समोर निदर्शने करणार आहे.

संध्याकाळी संपाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यामध्ये यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरावर संप यशस्वी करण्यासाठीच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा स्तरावरुन पदाधिकारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा संप यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्गाला एकजुट करुन सर्वांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरु असून, त्याचे देखील यावेळी नियोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *