अनय महामुनी व पालस टपळे ठरले प्रथम
स्पर्धेतून खेळाडू तंत्र व कौशल्य आत्मसात करतात -सुधीर चपळगावकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेतून खेळाडूंची जडणघडण होत असते. स्पर्धेतून खेळाडू तंत्र व कौशल्य आत्मसात करत असतो. कोणत्याही खेळात यशासाठी एकाग्रता व सातत्य आवश्यक आहे. शासन देखील खेळाडूंच्या पाठीमगे उभा असून, बक्षीसांमध्ये देखील भरीव वाढ करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांनी केले.

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे 11 वर्षा खालील मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन राज्य क्रीडा मार्गदर्शक चपळगावकर व बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी पटावर चाल देऊन केले. जुना कापड बाजार येथील नागर महाजनवाडी सभागृहात झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी चपळगावकर बोलत होते. यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी आदींसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे चपळगावकर म्हणाले की, बुद्धिबळ खेळासाठी वयाची मर्यादा नसते. अनेक युवा खेळाडू यामध्ये पुढे येत असून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने देखील भरीव निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धा व प्रशिक्षण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तर खेळाडूंना रोख बक्षिसं देण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात यशवंत बापट यांनी संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. अनेक उत्तम खेळाडू घडविण्याच्या ध्येयाने कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारूनाथ ढोकळे खेळाडूंना घडविण्यापासून ते ग्रॅण्ड मास्टर घडविण्यापर्यंत संघटनेचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली. अहमदनगर व महाराष्ट्राचे नेतृत्व करुन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बुध्दीबळ स्पर्धेत सहभागी झालेल्या 13 खेळाडूंचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चिमुकल्या खेळाडूंनी देखील उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. बुद्धिबळ पटावर काही अटीतटीच्या सामन्यांचा अनुभव उपस्थित पालक व बुध्दीबळ प्रेमींना घेण्यात आला. 45 खेळाडूंमध्ये 5 अटीतटीच्या फेर्यात बुध्दीबळाचे सामने रंगले होते. मुलांमध्ये प्रथम- अनय महामुनी (श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी), द्वितीय- अद्वैत महाजन (श्री विवेकानंद विद्या मंदिर, पाथर्डी), मुलींमध्ये प्रथम- पालस टपळे (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल), द्वितीय- योशना मंडलेचा (होम स्कूल) यांनी बक्षिसे पटकाविली. या खेळाडूंची रत्नागिरी येथे होणार्या राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ह्या सर्व खेळाडूंना अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया ह्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे खेळाडू अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत पंच म्हणून देवेंद्र ढोकळे, चेतन कड, मनीष जसवनी यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व पहिल्या 10 खेळाडूंना करंडक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.
