डाव्या पुरोगामी संघटना व पक्षांचे हिडेनबर्ग रिपोर्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिडेनबर्ग रिपोर्ट हा पुराव्यानिशी मांडला गेल्याने भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराचे आर्थिक धोरण व अदानीला सर्व नियम डावलून देशाच्या आर्थिक संस्था लुटायला केलेले सहाय्य समोर आले आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर देशभक्तीच्या आड लपण्याचे कार्य अदानी समूहाने केले. जनतेच्या जमा पुंजीवर नरेंद्र मोदी सरकारच्या मदतीने अदानी समुहाने हजारो कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळवून घेऊन देशाची फसवणूक केली. हा पैसा सर्वसामान्य भारतीयांचा होता. जनतेच्या पैशावर गब्बर होवून खाजगीकरण व भांडवलशाहीला प्रोत्साहन देऊन देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केला असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांनी केला.
प्रगतिशील, डाव्या, पुरोगामी, लोकशाहीवादी पक्ष व संघटनांच्या वतीने हिडेनबर्ग रिपोर्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर सीएसआरडी महाविद्यालयात माजी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानात कॉ. कानगो बोलत होते.

पुढे कानगो म्हणाले की, सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. हिडेनबर्गच्या रिपोर्टवर कोणी बोलू नये म्हणून जातीय दंगली, द्वेष पसरविण्याचे व विरोधकांना त्रास देण्याचे काम केंद्र सरकारने केले. त्याचेच उदाहरण राहुल गांधी यांच्यावरील कारवाई आहे. मोदींचे बलशाली भारत हे हिटलर, मुसलोनीवर आधारीत आहे. भारत देखील अमेरिकेच्या पाऊलावर पाऊल ठेवून शस्त्रास्त्र स्पर्धेत उतरला आहे. याचे परिणाम भयानक असणार आहे. अमेरिकेने सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून लष्करासाठी लागणारी युद्ध साधनसामग्रीचा व्यापार तेजीत ठेवला आहे. हा प्रकार भारताला परवडणारा नसेल. बलशाली भारत उभा करून सर्वसामान्य नागरिकांना कमजोर करण्याचे काम केले जात आहे. लोकांना खाली मान घालून सरकारचे ऐकण्यास भाग पाडणे हे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील ठराविक भांडवलदारांकडे आर्थिक केंद्रीकरण होत आहे. अशी राष्ट्रभक्ती संशयाच्या भोवर्यात असून, जनतेने चिकित्सा करण्याची गरज आहे. अदनीच्या चौकशीसाठी जनतेतून उठाव झाल्यास सरकार घाबरेल आणि सत्य बाहेर येईल. मात्र देशभक्तीच्या नावाखाली सर्व महत्त्वाचे मुद्दे बाजूला केले जात आहे, असे कॉ. कानगो म्हणाले. तर सध्याच्या आर्थिक व राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले.
माजी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे म्हणाले की, जीडीपी विकास दर वाढला म्हणजे विकास झाला, अशी चुकीची भ्रामक समजूत जनतेची करून दिली जाते. प्रत्यक्षात 193 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारत देशाचा नंबर 140 वा आहे. मानवी विकास निर्देशांकामध्येही आपल्या देशाचा नंबर बराच खाली आहे. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात नाही. चुकीच्या गोष्टींमुळे विकासाची भ्रामक समजूत करून दिली जाते. लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करायची असेल तर पुन्हा आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने आणि देशातील 20 टक्के युवकांच्या आधाराने ती करता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ मोदींचा द्वेष करून प्रश्न सुटणार नाहीत. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याच्या मुळा पर्यंत जाऊन ते जनतेच्या प्रबोधनाने आणि जनतेच्या विद्रोहानेच करता येणे शक्य आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने लोककल्याणकारी राज्य आणि स्थिर सरकार देऊ असं जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. यासाठी देशाचे युवक हे बदलाचे महत्त्वाचे घटक आहेत ते या प्रक्रियेमध्ये सामील होतील आणि मग बदल घडवणे सहज शक्य होईल. डाव्या पक्षांच्या मदतीने इतर समविचारी लोकशाहीवादी पक्षांच्या एकजूटीतून हे शक्य असल्याचे डॉ. निमसे यांनी सांगितले.
या व्याख्यानासाठी भाकपचे राज्यसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. बन्सी सातपुते, राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता पानसरे, जिल्हा सहसचिव अँड. कॉ. सुधीर टोकेकर, जिल्हा सहसचिव संतोष खोडदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अर्शद शेख, ज्ञानदेव पांडुळे, कॉ. महेबुब सय्यद, संजय झिंजे, भारती न्यालपेल्ली, सुलाबाई आदमाने, निलिमा बंडेलू, निर्मलाताई काटे, उमेश जोशी, फिरोज शेख, संध्या मेढे, रामदास वागस्कर आदी उपस्थित होते.