डॉक्टर्स डे निमित्त प्रीसिजन डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉ. योगिता डान्स योगा क्लासचा उपक्रम
योग्य आहार व व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -डॉ. योगीता सत्रे
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉक्टर्स डे निमित्त महिलांसाठी हाडांचा ठिसूळपणा, कॅल्शियमची व बोन मिनरलची कमी तपासण्यासाठी मोफत डेक्सा स्कॅन करण्यात आले. प्रीसिजन डायग्नोस्टिक सेंटर आणि डॉ. योगिता डान्स योगा क्लासच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
सध्याच्या फास्टफुड व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हाडांचा ठिसूळपणा, कॅल्शियमची कमी, बोन मिनरल ची कमी असण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर होणे व इतर आजार निर्माण होत आहेत. यासाठी योग्य निदान व उपचार न झाल्यास महिलांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन घेण्यात आलेल्या मोफत डेक्सा स्कॅन तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. योगीता सत्रे म्हणाले की, योग्य आहार व व्यायाम हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. निरोगी आरोग्य सर्वात मोठी देणगी असून, आपल्या शरीर स्वास्थ्याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणार्या महिला वर्गाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. तर विशिष्ट आहार व चांगल्या जीवनशैलीमुळे महिलांचे आरोग्य कसे चांगले राहू शकते, यावर मार्गदर्शन केले.
डॉ. रणजीत सत्रे यांनी औषधापेक्षा चांगला आहार सदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरतो. चूकीच्या आहार पध्दतीमुळे मनुष्याला विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. या शिबिरात ज्या महिलांच्या तपासणीत समस्या आढळल्या अशा महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुशील नेमाने व डॉ. राहुल कहर यांनी डेक्सा स्कॅन आधुनिक काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि चाळीशी पुढच्या महिलांनी भविष्यातील हाडांचे आजार टाळण्यासाठी महिला व पुरुषांनी ही तपासणी करण्याचे सांगितले.