कौशल्य, आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेकडे महिलांची वाटचाल
स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नाही, तर त्यासोबत कौशल्य अत्यावश्यक -शफाकत सय्यद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देत त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणाऱ्या जनशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून राहुरी येथील महिलांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. जनशिक्षण संस्था संचलित रुपाली फॅशन इन्स्टिटयूटच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना नुकतेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थी महिलांची मेहनत, जिद्द आणि यशाचा गौरव करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
राहुरी येथील संत नामदेव महाराज हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला राहुरीच्या माजी नगराध्यक्षा व नगरसेविका उषाताई तनपुरे, जनशिक्षण संस्थेचे प्रभारी संचालक शफाकत सय्यद, कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे वरिष्ठ संशोधन अधिकारी दिलावर सय्यद, सेपिअन्स रिसर्च महिला सबलीकरण विभागाच्या डॉ. मनीषा गालफाडे, बार्टीचे एजाज पिरजादे, रुपाली फॅशन इन्स्टिटयूटच्या संचालिका रुपाली चुंबळकर, अजय चुंबळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत वृक्षसंवर्धनाचा संदेश देत रोप देऊन तसेच प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू भेट देऊन करण्यात आले.
उषाताई तनपुरे यांनी आपल्या मनोगतात महिलांना प्रोत्साहन दिल्यास समाजाची सर्वांगीण प्रगती होईल, असे सांगितले. महिलांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे चालना मिळते. राहुरी नगरपालिकेच्या वतीने महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जनशिक्षण संस्थेचे प्रभारी संचालक शफाकत सय्यद म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण पुरेसे नाही, तर त्यासोबत कौशल्य असणे अत्यावश्यक आहे. जनशिक्षण संस्था ग्रामीण व शहरी भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सातत्याने करत आहे. महिलांनी शिकलेल्या कौशल्यांचा उपयोग करून लघुउद्योग, घरगुती व्यवसाय, शिवणकाम, फॅशन डिझाईनिंग, हस्तकला अशा विविध क्षेत्रांत स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला बचत गटांच्या माध्यमातून सामूहिक व्यवसाय उभारू शकतात. प्रशिक्षण म्हणजे केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर तो आत्मविश्वासाचा पाया आहे. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे आले तर समाजातील आर्थिक व सामाजिक परिवर्तन शक्य आहे. जनशिक्षण संस्था भविष्यातही अधिकाधिक महिलांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
बार्टीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी दिलावर सय्यद यांनी महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शासकीय योजनांच्या सहाय्याने आणि योग्य मार्केटिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा सदुपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, असे त्यांनी सांगितले.
रुपाली फॅशन इन्स्टिटयूटच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील महिलांना विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सौ. रुपाली चुंबळकर व अजय चुंबळकर यांचा बार्टीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भारती पवार, निलम पवार, स्मिता मगरे, रोहिणी गुजर, सीमा ठोकळे, राजश्री गाडे यांनी प्रशिक्षणाच्या अनुभवांबाबत मनोगत व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गितीका इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुवर्णा खैरनार यांनी मानले.
