• Sat. Mar 15th, 2025

स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी -पुष्पाताई बोरुडे

ByMirror

Mar 9, 2023

भुतकरवाडी येथे महिलांची आरोग्य तपासणी

नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, जय असोसिएशन ऑफ एनजीओचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी, तरच आपला देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती पथावर आहे. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर होऊन निर्भयपणे संकटाचा सामना करावा. भावी पिढी कशी घडवायची? ते महिलांच्या हातात असल्याचे प्रतिपादन नगरसेविका पुष्पाताई बोरुडे यांनी केले.


नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेविका बोरुडे बोलत होत्या. सावेडी, भुतकरवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी स्त्री रोग तज्ञ डॉ. योगिता सत्रे, डॉ. रेश्मा शेख, दंतरोग तज्ञ डॉ. वर्षा शिंदे नागरदेवळे सरपंच सविता पानमळकर, उपसरपंच पौर्णिमा शेलार, समृद्धी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, राजश्री धाडगे, जयश्री शिंदे, रावसाहेब काळे, अ‍ॅड. महेश शिंदे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


दंतरोग तज्ञ वर्षा शिंदे यांनी प्रत्येकाने दर तीन महिन्यात दाताची तपासणी केली पाहिजे. दात घासण्याचा ब्रश देखील दर तीन महिन्यांनी बदलला पाहिजे. अनेक आजार मुखाद्वारे होत असल्याचे मौखिक आरोग्य जपण्याचे त्यांनी आवाहन केले.


सरपंच सविता पानमळकर म्हणाल्या की, महिला कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो. स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. महिला सक्षमीकरणाची क्रांती खर्‍या अर्थाने सावित्रीबाई फुलेनी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. योगिता सत्रे यांनी महिला व युवतींनी छोट्या आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता, वेळीच योग्य औषध उपचार घेतले पाहिजे. आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


स्वाती डोमकावळे म्हणाल्या की, महिलांना हक्काची जाणीव झाल्याने, स्त्री शक्ती आज सक्षम होत आहे. स्त्री अबला नसून, धगधगता अंगारा आहे. कुटुंबाच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग असल्यास ते कुटुंब विकास साधत असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी महिलांसाठी असलेल्या हक्क व अधिकाराची तसेच विविध कायद्याची माहिती दिली.


प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शिबिराचे उद्घाटन करण्यत आले. यावेळी 110 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सब्बन यांनी केले. आभार स्वाती डोमकावळे यांनी मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी ऋतीक मोरे, प्रणाली भोताडे, आशा सब्बन, रूपाली मेढे, रजनी भुस्सा, वृषाली मेढे, पुष्पा तारांब, अंकिता सानप, संगीता बडे, प्रांजली जोशी, सोनाली मोरे, मोनाली कुलकर्णी, दीपिका जगताप, शारदा राऊत, सुनीता टिळेकर, राजहंस, पाटोळे, चोपडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, पोपटराव बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *