• Thu. Mar 13th, 2025

सोमवारी शहरात फिरत्या संगणक लॅबचे (डिजीटल बस) आगमन

ByMirror

Apr 1, 2023

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने होणार स्वागत

रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याकरिता शहरात सोमवारी (दि.3 एप्रिल) मुंबई येथून येणार्‍या फिरत्या संगणक लॅबचे (डिजीटल बस) भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूल व मासूम संस्था (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आधुनिक संगणकीय शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.


मासूम संस्थेच्या (मुंबई) संचालिका निकिता केतकर यांनी अहमदनगर मधील रात्रशाळेत शिक्षण घेणार्‍या व शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. सोमवारी पटवर्धन चौक येथील भाई सथ्था नाईट हायस्कूल येथे या बसचे आगमन होणार आहे. ही डिजिटल बस नगर शहरात प्रथमच येत असल्याने शहरातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी बस उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी दिली.

डिजिटल बसच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होणार्‍या संगणक प्रशिक्षणाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष अजितजी बोरा यांनी केले आहे. बसच्या स्वागतासाठी शालेय समिती सदस्य विलास बडवे, प्राचार्य सुनील सुसरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *