काळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विशेष सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली 350 व्या वर्षानिमित्त मुंबई येथील पत्रकार संघाच्या भवनात हा सोहळा पार पडला. यामध्ये काळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष सन्मान करण्यात आले.

उद्योजिका संगीता गुरव व अभिनेत्री सायली पावस्कर यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवून त्या सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची मोहिम देखील सुरु केली आहे.
त्या हिरकणी ग्रुपच्या अध्यक्ष व मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून, महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.