ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, रिपाईचे आयुक्तांना निवेदन
काटवन खंडोबा कमान ते आगरकर मळा रस्त्याचे काम देखील मार्गी लावण्याची मागणी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अहमदनगर महापालिकेने राज्यात तिसरे स्थान पटकाविले असले, तरी शहरालगत असलेल्या काटवन खंडोबा रोड, येथील साई कॉलनीत ड्रेनेज प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष केले जात आहे. या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने नागरिकांनी महापालिकेकडे ड्रेनेज लाईन टाकता का? ड्रेनेज लाईन! ची आर्त हाक दिली.
या भागातील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. साई कॉलनीत 40 ते 50 घरे असलेल्या लोक वस्तीत कोणत्याही प्रकारची लाईन व गटार नसल्याने साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची देखील संभावना असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर काटवन खंडोबा कमान ते आगरकर मळा रस्त्या देखील अत्यंत खराब झाला पावसाळ्यात नागरिकांना घरा बाहेर पडणे अवघड झाले आहे. खड्डे व चिखलमय रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, विद्यार्थ्यांना शाळेत सोडताना देखील नागरिकांना अडचणी येत आहे. या भागातील नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस काढत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाची दखल घेऊन काटवन खंडोबा रोड, येथील साई कॉलनीत ड्रेनेज लाईन व रखडलेल्या आगरकर मळा रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. तर मागणी पूर्ण न झाल्यास महापालिके समोर नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. यावेळी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे गुलामअली शेख, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, नईम शेख, बंटी भिंगारदिवे, शेख, संगीता दारकुंडे, रेश्मा खान, विमल चव्हाण, शमीम बागवान, जयश्री दारकुंडे, शकीला खान, कविता वरतले, साफिया बागवान, सुनिता नेटके, रोहिणी भोयर, हर्षदा वरतले, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.