सैनिक बँकेच्या चेअरमन व आधिकार्यांवर गुन्हा दाखल करा
सोमवार पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत चेक क्लिअरिंग मध्ये अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयाचां घोटाळा चेअरमन, मुख्यकार्यकारी अधिकारी व शाखाअधिकारी यांच्या सहभागातून झाला असून, जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या आधिकार्यावर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा या मागणीसाठी सोमवारी (दि.6 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व सैनिक बँकेचे सभासद विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, कॅप्टन विठ्ठल वराळ यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील आधिकारी, क्लार्कशी संगनमत करून चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर करत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र या चेक घोटाळा प्रकरणात शाखाअधिकारी सदाशिव फरांडे हा व त्याला पाठीशी घालणारे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे यांना जबाबदार धरण्यात आल्याचा अहवाल सहकार विभागाचे पारनेरचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी यांनी दिला आहे. त्यामुळे आता सहकार विभागाच्या आधिकार्याने फिर्यादी होऊन मुख्य सूत्रधार शाखाधिकारी सदाशिव फरांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी व्यवहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहवालात फिर्यादीच आरोपीच्या पिंजर्यात ?
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील शाखा अधिकारी व क्लार्कशी संगनमत करून चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर करत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण जुलै 2021 मध्ये घडल्यावर संचालक सुदाम कोथिंबीरें व अन्य दोन तीन संचालकांनी तात्काळ मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी व्यवहारे यांना मेल, व्हॉटसअप भ्रमणध्वनी वर पाठवून जबाबदार शाखाधिकारी व दोषी असलेल्या कर्मचार्यांना निलंबित करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले होते, मात्र ते पत्र संजय कोरडे व शिवाजी व्यवहारे यांनी दडवून ठेवत शाखाअधिकारी सदाशिव फरांडे याला फेब्रुवारी 2023 पर्यत पाठीशी घातले. दरम्यानच्या काळात सभासद विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, कॅप्टन विठ्ठल वराळ व बाळासाहेब नरसाळे यांनी घोटाळ्याची थेट तक्रार सहकार आयुक्त यांच्याकडे केली. सहकार आयुक्ताने तत्काळ या पत्राची दखल घेऊन पारनेरचे सहाय्यक निबंध गणेश औटी यांची तपासासाठी नेमणूक केली.
औटी यांचा तपास सुरु असतानाच शाखाअधिकारी सदाशिव फरांडे हा सही सलामत सुटण्यासाठी संजय कोरडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात अपुरी माहिती देत खातेदार व एका क्लार्क विरोधात गुन्हा दाखल केला. आता सहकार विभागाचा अहवाल आला असून, सदर चेक प्रकरणात शाखाधिकारी सदाशिव फरांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी व्यवहारे यांच्यावर अक्षम्य चूक व कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत जबाबदार धरले आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाला असून, संजय कोरडे, शिवाजी व्यवहारे, सदाशिव फरांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उपोषण केले जाणार आहे.
