भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्म सभेच्या वतीने सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरा समोर श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाचा सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. जय हनुमान ज्ञान गुणसागर… जय कपिस तिहुँ लोक उजागर…असा जयघोष करीत हनुमान चालिसाला प्रारंभ झाला. या धार्मिक कार्यक्रमासाठी पंजाबी समाजासह इतर समाजाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राधा-कृष्ण मंदिराच्या प्रांगणात हा धार्मिक सोहळा रंगला होता. रात्री उशीरा पर्यंत भजन संध्येने या कार्यक्रमाची रंगत वाढविल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय बनले होते. भगवान श्रीरामच्या आकर्षक मुर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. सामूदायिक हनुमान चालिसा पठणाने भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन झाले होते.
राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या भाविकांचे स्वागत करुन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाने सादर केलेल्या कार्यक्रमाबद्दल आभार मानले. तर सत्संग मंडळाच्या सदस्यांचा व मागील 20 वर्षापासून हनुमान चाळीसा सोहळ्यात सेवा देणारे किरण वीजन यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित समाजबांधव ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. भाविकांना यावेळी प्रसादचे वाटण्यात आले.

राधा-कृष्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रभू श्रीराम व हनुमानजींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. हनुमान जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
