यशोधन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
आर्थिक सक्षम होऊन विकास साधण्यासाठी महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घ्यावे -दीपिका भोस
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीयन परंपरेला साजेशी विविध प्रकारच्या नऊवारी साडी बनविण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबीराला महिला व युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा दीपिका भोस यांनी दिली.

महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सावेडी येथील भिस्तबाग, विठ्ठलनगर येथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या नऊरात्री, दिवाळी व दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये पारंपारिक नऊवारी साडी नेसण्याची क्रेझ दिवसंदिवस वाढत आहे. बाजारापेक्षा अधिक आकर्षक नऊवारी साड्या महिला तयार करणार असून, त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. यामध्ये मस्तानी, लावणी साडी, मराठमोळी डबल, जिजाऊ काष्टा, ब्राह्मणी, राजलक्ष्मी काष्टा, शाही मस्तानी आणि कथ्थक साड्यांचे प्रकार महिलांना शिकवण्यात येत असल्याचे दीपिका भोस यांनी सांगितले. तर आर्थिक सक्षम होऊन विकास साधण्यासाठी महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी आवाहन केले.
संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण राबविण्यात येत असून, शिका आणि कमवा या उद्देशाने नऊवारी साडी बनविण्याचे दहा दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. पहिल्या बॅचला उत्सफुर्त प्रतिसाद लाभल्याने लवकरच नवीन बॅच महिलांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9960958736 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

