माजी विद्यार्थी संघाचा तिळगुळ वाटप व स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचा उपक्रम
विद्यार्थ्यांचा कवितेतून विविध सामाजिक विषयांना स्पर्श
अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतीनिमित्त अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये स्वरचित काव्य वाचन स्पर्धा रंगली होती. विद्यार्थ्यांनी स्वत: रचलेल्या कविता सादर करुन विविध सामाजिक विषयांवर बोट दाखविले. तर तिळगुळ वाटपाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

दरवर्षीप्रमाणे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शाळेच्या मोने कला मंदिरात हा सोहळा रंगला होता. विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सायली देशपांडे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव पी.डी. कुलकर्णी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पद्माकर देशपांडे, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रवींद्र शिंदे, आशा सातपुते आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पी.डी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केल्या जाणार्या विविध उपक्रमांची व काव्यवाचन स्पर्धेची माहिती दिली.
सायली देशपांडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व शिक्षक घडवितात व संस्कार रुजवतात. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे. वाचाल तर लिहू शकाल, यासाठी वाचनाचा छंद जोपासावा. वाचनातून शब्दसंचय वाढविण्याचे आवाहन करुन कवितेतून विद्यार्थ्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.

अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड यांनी संक्राती सणाचे महत्त्व सांगून, पतंग उडवताना स्वतःबरोबर इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले. आपल्या स्नेहपूर्वक गोड बोलण्याने अडचणीच्या वेळी आपल्याला इतरांची सहज मदत होत असल्याचे एका उद्बोधक कथेतून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचे परीक्षण सुदर्शन कुलकर्णी, दर्शन काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मेहेर, शितल डिमळे यांनी केले. आभार यशश्री कुलकर्णी यांनी मानले. सुषमा मुदगल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
