• Fri. Jan 30th, 2026

श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त

ByMirror

Feb 9, 2023

बोडखे सरांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या मुलांचे भवितव्य घडविले – अभिलाष घिगे

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर यांनी केले. विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून वाटचाल करतांना त्यांनी शिक्षणातून अनेक शेतकर्‍यांच्या मुलांचे भवितव्य घडविले. विद्यार्थ्यांना गुणसंपन्न करण्यासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे पाटील यांनी केले.


तांदळी वडगाव (ता. नगर) येथील श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रभाकर बोडखे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात घिगे बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच दादा दरेकर, उद्योजक प्रकाश आंधळे, कामरगाव सोसायटीचे चेअरमन वसंतराव ठोकळ, व्हाईस चेअरमन राजेंद्र आंधळे, डॉ. अंबादास डमाळे, बाळासाहेब आंधळे, सुभाष बोडखे, मिनाक्षी प्रभाकर बोडखे, योगेश बोडखे, सुवर्णा बोडखे, प्रगती बोडखे, कीर्ती नागरगोजे- बोडखे आदींसह शालेय शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


बाळासाहेब हराळ यांनी संस्था, पालक यांच्या सहकार्यातून व शिक्षकांच्या मेहनतीतून धर्मनाथ विद्यालयाने गुणवत्तेने सर्वसामान्यांची मुले घडवून एक आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून बोडखे सरांच्या कार्याला उजाळा दिला. मिनाक्षी बोडखे यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य केंद्रबिंदू माणून बोडखे सरांनी योगदान दिल्याचे सांगितले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक कराळे सर, पिंपळे सर, जयश्री उकिर्डे, कुलांगे सर, जयसिंग उबाळे, अशोक पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कार्ले यांनी केले. आभार सुभाष बोडखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *