• Sat. Mar 15th, 2025

शिक्षण उपसंचालकांच्या उपस्थितीत शहरात शिक्षकांची सहविचार सभा

ByMirror

Sep 20, 2022

वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदीसह शिक्षकांनी मांडले विविध प्रश्‍न

तातडीने प्रश्‍नांचा निपटारा करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांसाठी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयात सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक स्वाती हवेले, वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश प्रधान, व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये शिक्षण विभागाशी निगडीत विविध प्रश्‍न, वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडील प्रलंबीत कामे व वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदीवर चर्चा करण्यात आली.


या सभेसाठी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सचिव आप्पासाहेब शिंदे, हिरालाल पगडाल, एम.एस. लगड, आबासाहेब कोकाटे, उद्धव गुंड, महेंद्र हिंगे, अशोक सोनवणे, भीमराव खोसे, नंदकुमार शितोळे, देविदास पालवे, हरिश्‍चंद्र नलगे, प्रशांत होन, संभाजी गाडे, गिताराम वाघ, प्रवीण गायकवाड, रमेश बोलघट, विजय थोरात, महेश दरेकर आदींसह शिक्षक उपस्थित होते.


यामध्ये मागील सहा वर्षात शिक्षण उपसंचालक यांच्याबरोबर एकही सविचार सभा झाली नाही. याबाबत खुलासा व्हावा तसेच सहा वर्षांपूर्वी झालेले सभेचे इतिवृत्त अद्यापि संघटनेला प्राप्त झाले नाही, याबाबत खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी स्लिपचे काम किती झाले? याबाबत माहिती मिळावी व अनेका सेवकांना स्लीप मिळालेले नसल्याचे बैठकित स्पष्ट करण्यात आले. एनपीएस, डीसीपीएस धारक शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता मिळालेला नसून, यासंदर्भात खुलासा व्हावा आदी शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्‍न संदर्भात चर्चा करण्यात आली.

तसेच शिक्षकांवर एकाचवेळी अनेक अशैक्षणिक कामे लादली जात असल्याचे प्रश्‍न मांडून विविध विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. सुधीर तांबे यांनी प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावण्याचे सुचना केल्या. उपस्थित अधिकार्‍यांनी विविध प्रश्‍नांवर खुलासा केला. शिक्षण उपसंचालक उकिर्डे यांनी सर्व प्रश्‍नांची दखल घेऊन त्याचा तातडीने निपटारा केला जाणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *