शिक्षण आयुक्तांसह झालेल्या बैठकीत शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्नावर चर्चा
शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी शिक्षण आयुक्त सकारात्मक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या विविध प्रश्न व प्रलंबीत मागण्यांसाठी पुणे येथे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व शिक्षक, शिक्षकेतरांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने शिक्षकांचे पगार हे पूर्वीप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन आदींसह इतर प्रश्नांवर चर्चा झाली.
या बैठकीसाठी अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, सहसचिव भाऊसाहेब जीवडे, खजिनदार बाळासाहेब निवडुंगे, नंदकुमार शितोळे आदींसह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण आयुक्तांपुढे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी पूर्वीप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्याचा विषय लावून धरला. यावर शिक्षण आयुक्तांनी यावर सकारत्मक भूमिका दर्शवीत या आदेशाची प्रत शिक्षण विभागाला लवकर काढली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
तसेच विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षकांचे रखडलेले मेडिकल बिले, फरक बिले, अनुदानावर आलेल्या शिक्षकांचे शालार्थ आयडी, जिल्ह्यातील दिवंगत कर्मचार्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरील भरती, अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ झालेले आहेत त्याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करणे, घोषित शाळा व तुकड्यांचे प्रश्न, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण घेणे आदी विषयासंबंधीत बैठकीत चर्चा करण्यात आली. आमदार सत्यजित तांबे यांनी सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आयुक्तांकडे मागणी केली. तसेच शिक्षण आयुक्त स्तरावरील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.
दहावी व बारावी परीक्षा दरम्यान काही तालुक्यात शिक्षकांवर प्राणघातक हल्ले झाले. या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नये, जिल्ह्यातील शिक्षकांचे पेपर तपासणीचे मानधन मिळावे, शिक्षकेतर कर्मचार्यांनी शैक्षणिक अहर्ता वाढविली तर त्यांना पदोन्नती मिळावी, वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यासंदर्भातही सखोल चर्चा करण्यात आली.