शारदा विद्या निकेतन संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणात परिस्थिती व भवितव्य बदलण्याची शक्ती आहे. गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्ता सिध्द करुन विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले.
शारदा विद्या निकेतनच्या श्रीगोंदा येथील सावित्रीबाई फुले बालवाडी, सुनंदाताई होनराव प्राथमिक, मुरलीधर (आण्णा) होनराव माध्यमिक व एन. एस. गुळवे ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोडखे बोलत होते.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नायब तहसीलदार नेवसे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीगोंदा बार असोसिएशनचे अॅड. संतोष मोटे पाटील, चंद्रकांत चौधरी, पांडुरंग खेतमाळीस, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ. अशोक खेंडके, संस्था विश्वस्त अशोकराव होनराव, प्रा. कांचन कोरडे, डॉ. नानासाहेब कुरुमकर, मुख्याध्यापिका संगिता वनपुरे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. कांचन कोरडे, बालवाडी विभागाच्या गौरी कोहोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शितल मदने, पुनम क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना बोडखे म्हणाले की, शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केल्यास यश मिळणार आहे. मोबाईलमुळे पालक व मुलांमधील सुसंवाद बिघडल्याने मुलांचे भविष्य अंधकारमय होत आहे. पालकांनी मुलांना आत्मविश्वास व प्रोत्साहन द्यावे. मुलांनी देखील पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे त्यांनी आवाहन केले.
नायब तहसीलदार नेवसे यांनी शालेय गुणवत्तेचे व मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी विद्यालयात राबविण्यात येणार्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी. टी. मखरे यांनी केले. शितल मदने यांनी शाळेसाठी पुस्तके व आर्थिक मदतीचा धनादेश दिला.

कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कोरोना काळात बंद झालेल्या शाळेवर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आदित्य अनवणे याने सादर केलेल्या एकपात्री नाटक व पळून गेलेल्या मुलीच्या बापाची व्यथा या नाटिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काटे यांनी केले. आभार डॉ. नानासाहेब कुरूमकर यांनी मांनले.
