कर्मचार्यांना लवकर मिळणार फरकाची रक्कम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर शहर सहाकरी बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये बँकेतील सेवकांसाठी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. बँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता मान्यताप्राप्त युनियन व बँक व्यवस्थापन दोघांनीही सलोख्याची भूमिका घेऊन वाढत्या महागाईत सेवकांचे समाधान होईल या पध्दतीने समाधानकाराक पगारवाढ दिली आहे.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करार पार पडला. सर्व कर्मचार्यांना 1 एप्रिल 2019 पासून वेतन वाढ देण्याचा करार झाला असून, पूर्वलक्षी प्रमाणे सेवकांना वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे. करार संपल्यापासून पुढील पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे. फरकाची रक्कम मिळणार असल्याने कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
करारावर बँकेच्या वतीने चेअरमन सुभाष गुंदेचा, व्हाईस चेअरमन सुजित बेडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वीर खान यांनी स्वाक्षर्या केला. तर युनियनच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे, सहचिटणीस नितीन भंडारी व खजिनदार मुरलीधर कुलकर्णी यांनी सह्या केल्या. सदर प्रसंगी बँकेचे संचालक मंडळ व युनियनच्या वतीने कार्यकारणी सदस्य संजय घुले, संतोष मखरे उपस्थित होते. करारानंतर युनियनच्या पदाधिकार्यांनी बँकेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी युनियनचे संपूर्णपणे सहकार्य राहणार असल्याचे बँक व्यवस्थापनाला आश्वासित केले. बँकेचे चेअरमन गुंदेचा यांनी युनियनने सौहार्दपूर्वक भूमिका घेतल्याबद्दल युनियन पदाधिकारींचे आभार मानले.