अमृत पाणी योजनेच्या कामाची उपमहापौर भोसले, नगरसेविका जाधव व नगरसेवक गायकवाड यांनी केली पहाणी
पाईपलाइनचे वॉशआऊट व लिकेजची दुरुस्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह रेल्वे स्टेशन व आगरकर मळा परिसरात दुषित पाणी पुरवठ्याचा व कमी दाबाने येणार्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्या दृष्टीकोनाने नवीन अमृत पाणी योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाइनचे वॉशआऊट करण्यात आले व लिकेज असलेल्या पाईपची दुरुस्ती नुकतीच करण्यात आली.
रेल्वे स्टेशनच्या लोखंडी पूल येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेविका सुर्वणा जाधव, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, इंजि. गीते आदींसह मनपाचे पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले यांनी संपूर्ण शहरासह रेल्वे स्टेशन व आगरकर मळा परिसरात पुरेश्या दाबाने स्वच्छ पाणी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असल्याचे स्पष्ट केले. नगरसेविका सुर्वणा जाधव म्हणाल्या की, रेल्वे स्टेशन व आगरकर मळा परिसरातील काही भागात दुषित पाणी नळाद्वारे येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. तर पुरेश्या दाबाने पाणी येत नसल्याने पाणीपट्टी भरुन देखील नागरिकांना पाणी मिळत नव्हते. मात्र नवीन अमृत पाणी योजने अंतर्गत नागरिकांना स्वच्छ व पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.