• Thu. Oct 16th, 2025

शहरातील कोविड सेंटरच्या बोगस परवानगी प्रकरणी तपासाला गती द्यावी

ByMirror

Nov 30, 2022

कोविड केअर सेंटरची बोगस परवानगी घेऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व हॉस्पीटल चालविण्यात आले -संदिप भांबरकर

तपासात डॉक्टर संघटनेचा हस्तक्षेप, तर आयुक्त देखील पोलीसांना तपासासाठी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात कोविड केअर सेंटरची बोगस परवानगी घेऊन डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व हॉस्पीटल चालवून रुग्णांना उपचार देणारे खासगी हॉस्पिटल व अधिकार नसताना परवानग्यांची खैरात करणार्‍या त्या मनपा आरोग्य अधिकारीची या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, तर या प्रकरणात हस्तेक्षेप करुन खासगी डॉक्टरांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टर संघटनेच्या दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांच्या जिविताशी खेळून अनेकांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक व कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते संदिप अशोक भांबरकर यांनी बुधवारी (30 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

संदिप भांबरकर

या प्रकरणात शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन कोणतीही शहानिशा न करता कोविड सेंटरच्या परवानग्या देण्यात आल्या, डॉक्टरांची संघटना दबाव तंत्र वापरुन तपासात अडथळा निर्माण करीत आहे. तर या प्रकरणात मनपा आयुक्त देखील आरोग्य अधिकारी यांना वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाला पुरावे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अरोप भांबरकर यांनी केला आहे. सर्व सामान्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी त्यांनी या प्रश्‍नावर जन आंदोलन करण्याचा व वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.


शासनाच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल या त्रिस्तरीय रचना केली होती. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपाचार देण्याची व्यवस्था होती. तर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल मध्ये जे रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असून, त्यांना तीव्र लक्षणे आहेत अशा रुग्णांना उपचार देण्याची व्यवस्था केलेली होती. 24 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार खाजगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याचे सर्व अधिकार मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना नव्हता, हा आदेश फक्त मनपा संचलित कोविड सेंटरसाठी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल) होता. कोविड सेंटरची परवानगी देण्याचा अधिकार फक्त आयुक्तांना होता. शासनाच्या आदेशान्वये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तर मनपा हद्दीत आयुक्तांना कोविड सेंटरसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आलेली होती.


केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या सूचनेचा गैरअर्थ लावून व मनपाचे आरोग्य अधिकारी यांच्याशी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बेकायदेशीररित्या संगमनत करुन कोविड केअर सेंटरची मागणी केली. त्यास मनपा वैद्यकीय अधिकारी यांनी अधिकार नसतांनाही फक्त कोविड केअर सेंटरचीच परवानगी दिली. परंतू खासगी रुग्णालयांनी आर्थिक हव्यासापोटी परवानगी नसताना स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये उपचार दिले. अतितीव्र रुग्ण तपासण्याचा व उपचार करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे माहित असतांनादेखील त्यांच्यावर उपचार केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना जेथे व्हेंटीलेटरची सुविधा असेल अशा डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले.


महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी महानगरपालिका हद्दीत कोविड केअर सेंटरला बोगस परवानग्या देऊन कोविड रुग्णांच्या जिवीताशी खेळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जास्त रुग्ण दगावले असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे. शहराबाहेर असलेल्या अनेक डॉक्टरांच्या नावाने शहरात परवानग्या देण्यात आल्या. मात्र हे डॉक्टर उपचारासाठी कधी शहरात आलेच नव्हते. केडगावचे हॉस्पिटल मध्ये एक एमआर हा रुग्णांवर उपचार करीत होता. बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये कम्पाऊंडर उपचार करुन रुग्णांकडून पैसे उकाळीत असल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले.


खासगी हॉस्पीटलला परवानग्या देतांना आरोग्य अधिकारी यांनी डॉक्टरचे शिक्षण, हॉस्पीटलमधील सेवा, सुविधा याची शहानिशा न करता कोविड उपचारासाठी परवानग्या दिल्या. चुकीचे नियोजन, सुविधांचा अभाव यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. याच कारणामुळे मनपा आयुक्तांनी आरोग्य अधिकारी यांना 8 जून 2021 रोजी सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 80 टक्के खाजगी हॉस्पिटल राखीव केले होते. त्याची स्वतंत्र यादी महानगरपालिकेने दिली आहे. त्यामुळे या बोगस खासगी हॉस्पिटल धारकांचा आणि 80 टक्के राखीव हॉस्पिटल धारकांचा काही संबंध येत नसल्याचे भांबरकर यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *