• Thu. Jan 22nd, 2026

शहरातील एका बांधकाम व्यावसायिकासह इतर चार ते पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

ByMirror

Jul 9, 2023

30 गुंठे जागेची संरक्षक भिंत तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न झाल्याची पटवारी यांनी केली होती तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोकळ्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकरण गाजत असताना, अमन अमित पटवारी (रा. जालना, जि. संभाजीनगर) यांनी आपल्या 30 गुंठे जागेच्या सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक व कोतवालीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केल्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन निर्मल मुथा व इतर चार ते पाच व्यक्तींवर कोतवाली पोलीस स्टेशनला शनिवारी (दि.8 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला.


पटवारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, आमची मौजे माळीवाडा, येथील गट नं. 8/12 व 9/3 भवानीनगर जवळ वाकोडी रोड, भोसले लॉनच्या अलीकडे 30 गुंठे जागेच्या प्लॉटवर 6 जुलै रोजी माझे वडिलांचे मित्र जाकीर हुसेन नसीर पठाण यांच्याकडून पक्के सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत बांधून घेतली होती. सदर प्लॉटवर मी अधून-मधून येत असतो. 7 जुलै रोजी मी व माझे वडील अमित शशिकांत पटवारी जालना येथून सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास आमच्या जागेची पहाणी करण्यासाठी आलो होतो. मात्र त्या जागेवर बांधलेली सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत पूर्णपणे पाडल्याचे दिसून आले. त्यावेळी मी व माझे वडीलांनी आजूबाजूला चौकशी केली असता, आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, निर्मल मुथा आणि इतर चार-पाच लोक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जेसीबी घेऊन आले होते. त्यांनी तुमचे सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचे सांगितले. या प्रकरणात सदर जागेची संरक्षक भिंत जेसीबीने पाडून बळजबरीने ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत पटवारी यांनी म्हंटले आहे.


पटवारी यांनी सदर जागेवर बांधलेली संरक्षक भिंत जेसीबीद्वारे तोडून, राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींकडून दहशतीने जागा बळकाविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा करुन याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार केली होती. पटवारी यांच्या 30 गुंठे जागेवर असलेली सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडून त्याचे नुकसान करुन अतिक्रमणाद्वारे बळजबरीने बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सबंधितांवर भा.द.वि. 427, 447, 511 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *