वेग, सहनशक्ती व फिटनेसचे उत्कृष्ट प्रदर्शन; विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड
राज्यातील 240 सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; चांदबीबी महाल परिसर गजबजला सायकपटूंनी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व सायकलिंग असोसिएशन ऑफ अहिल्यानगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस क्रीडा स्पर्धा चांदबीबी महाल, वाळुंज बायपास येथे अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सकाळी कडाक्याच्या थंडीत सायकलपटूंनी आपल्या वेग, सहनशक्ती व फिटनेसचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. वाऱ्याच्या गतीने सायकलपटूंनी या स्पर्धेत सायकल चालवली.

थंडीच्या आल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत मुला-मुलींच्या 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील 12 इव्हेंट घेण्यात आले. 5, 10 व 20 किलोमीटरच्या विविध गटात झालेल्या शर्यतींमुळे संपूर्ण रस्ता सायकलपटूंनी गजबजून गेला होता. महाराष्ट्रातील सहा विभागातून 240 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या हस्ते सायकल रेसला झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या दिपाली पाटील, प्रा. साईनाथ थोरात, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे खजिनदार भिकन अंबे, दिपाली शिलडनकर, रावसाहेब बाबर, सायकलिंग असोसिएशनचे सचिव प्रा. संजय साठे, आरती माने, संजय शिंदे, संभाजी मोहिते, स्वप्निल माने, सागर कोळपकर, शैलेश गवळी, प्रायोजक अविनाश सातपुते, एकलव्य पुरस्कार विजेते सचिन सातपुते, उद्योजक ईश्वर बेरड आदी मान्यवरांसह खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात दिपाली पाटील म्हणाल्या की, सायकलिंग या खेळात महाराष्ट्रातील खेळाडू आघाडीवर आहेत. पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग इव्हेंटची माहिती देताना त्यांनी सांगितले की, मोठ्या स्पर्धा 120 ते 150 किलोमीटरपर्यंत असतात, तर शालेय स्तरावर 40 किलोमीटरपर्यंत शर्यती घेतल्या जातात. सायकलिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या सायकलींची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत असून, सायकलपटू ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने धाव घेतात, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, खेळाडूंनी आपला फिटनेस कायम चांगला ठेवावा. उत्तम फिटनेस असल्यास खेळाडू कोणत्याही स्पर्धेत उजळून निघतो. कष्टाशिवाय यशाचा पर्याय नसून, नियमित व्यायाम व शिस्तबद्ध जीवनशैलीचा त्यांनी संदेश दिला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही खेळात सातत्यपूर्ण सराव सर्वात महत्त्वाचा असतो. पराभव मनाला न लावता, जिंकण्यापर्यंत सराव सुरू ठेवावा. खेळासोबतच अभ्यासाकडेही लक्ष देणे आवश्यक असून, योग्य मार्गदर्शनाखाली घडलेला खेळाडू निश्चितच यशस्वी होतो, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, खेळाडूंनी यश व अपयश पचवायला शिकावे. पराभवाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवल्यास यश निश्चित मिळते. या स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. स्पर्धेदरम्यान कोणताही हस्तक्षेप न करता तज्ञ पंच व तांत्रिक समितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात विविध खेळांच्या 13 राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब बाबर यांनी केले. प्रा. संजय साठे यांनी भारताच्या सायकलिंग संघात 18 ते 19 खेळाडू महाराष्ट्रातील असल्याची माहिती दिली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जनरल चॅम्पियनशिप पटकावल्याचे त्यांनी नमूद करत सर्वांचे आभार मानले.
सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच घार्गे यांनी सायकल चालविण्याचा देखील आनंद घेतला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय सायकलिंग रोड रेस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
14 वर्षे मुली मास स्टार्ट प्रथम- मुग्धा कर्वे (पुणे), द्वितीय- समीक्षा देवने (लातूर), तृतीय- कार्तिकी भोसले (नाशिक).
14 वर्षे मुले मास स्टार्ट प्रथम- श्रव वाळके (पुणे), द्वितीय- वेदांत टिळेकर (पुणे), तृतीय- स्वराज हिंगे (मुंबई).
14 वर्षे मुली टाईम ट्रायल प्रथम- अर्णवी सावंत (कोल्हापूर), द्वितीय- सृष्टी जगताप (पुणे), तृतीय- नयना शेंडगे (कोल्हापूर).
14 वर्षे मुले टाईम ट्रायल प्रथम- जीवीन मार्लेषा (मुंबई), द्वितीय- धृव बांदल (कोल्हापूर), तृतीय- स्तवन तिवडे (कोल्हापूर).
17 वर्षे मुली मास स्टार्ट प्रथम- गायत्री तांबवेकर (पुणे), द्वितीय- राजनंदनी सोमवंशी (क्रीडा प्रबोधिनी), तृतीय- अंकिता पुजारी (क्रीडा प्रबोधिनी).
17 वर्षे मुले मास स्टार्ट प्रथम- शौनिशा आ.व्ही. (पुणे), द्वितीय- रुद्रनिल पाटील (कोल्हापूर), तृतीय- शंभूराजे यादव (लातूर).
17 वर्षे मुली टाईम ट्रायल प्रथम- मानसी महाजन (पुणे), द्वितीय- श्रावणी कारंडे (कोल्हापूर), तृतीय- ज्ञानेश्वरी माने (पुणे).
17 वर्षे मुले टाईम ट्रायल प्रथम- दिग्विजय नवले (पुणे), द्वितीय- वेदांत पानसरे (मुंबई), तृतीय- श्रीनिवास जाधव (क्रीडा प्रबोधिनी).
19 वर्षे मुली टाईम ट्रायल प्रथम- श्रावणी परीट (पुणे), द्वितीय- श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर), तृतीय- तनुजा बागुल (नाशिक).
19 वर्षे मुले टाईम ट्रायल प्रथम- आर्यन मळगे (कोल्हापूर), द्वितीय- प्रणय चीनगुंडे (लातूर), तृतीय- रोहित महाडिक (मुंबर्इ).
19 वर्षे मुली मास स्टार्ट प्रथम- श्रावणी कासार (क्रीडा प्रबोधिनी), द्वितीय- संध्या शिंदे (क्रीडा प्रबोधिनी), तृतीय- श्रावणी जगताप (लातूर).
19 वर्षे मुले मास स्टार्ट प्रथम- चैतन्य हांडीक (मुंबई), द्वितीय- नरेंद्र सोमवंशी (लातूर), तृतीय- ओंकार गांधले (पुणे).
