• Sun. Feb 15th, 2026

वाकोडी फाटा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले जलकुंडात गणेश विसर्जन

ByMirror

Sep 10, 2022

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण पूरक पध्दतीने लाडक्या गणरायाला निरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण पूरक पध्दतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीला नगर तालुक्यातील दरेवाडी, वाकोडी फाटा येथे जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. गावात जल प्रदूषण टाळण्यासाठी साकारण्यात आलेल्या या जलकुंडात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन केले. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर या जलकुंड परिसरात निनादला. तर जलकुंडात गणपती विसर्जन करणार्‍या भाविकांना प्रसादरुपी वृक्ष भेट देण्यात आले.


जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शहरासह उपनगर व नगर तालुक्यात दरवर्षी प्रमाणे पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा… संदेश देत शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे मोफत वितरण करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.9 सप्टेंबर) खास फाऊंडेशनच्या माध्यमातून दरेवाडी, वाकोडी फाटा येथे आकर्षक फुलांची सजावट व मांडव टाकून या जलकुंडाची निर्मिती करण्यात आली.

या जलकुंडाचा अनावरण धर्मादाय आयुक्त वंदना पाटील- चव्हाण यांच्या हस्ते गणेश विसर्जनाने करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, एसबीआय बँकेचे मुख्य प्रबंधक अजय कुमार, वैभव रत्नपारखी, संदीप राहींज, नयनाताई बनकर, अ‍ॅड. महेश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अंबिका बनसोडे, सचिव डॉ. धनाजी बनसोडे, डॉ. संतोष गिर्‍हे, परागबाई राहींज, अनिल राहींज, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले, एकनाथ ससे, किशोर दरेकर, सुनील बेरड, दिनेश जगताप, सोमनाथ राऊत, सचिन राहींज, तात्या सांगळे, गोरख गवळी, श्रीराम निमसे आदी उपस्थित होते.


धर्मादाय आयुक्त वंदना पाटील- चव्हाण यांनी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला पर्यावरण पूरक गणेशोत्सव ही संकल्पना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. डॉ. धनाजी बनसोडे म्हणाले की, पाणी हा भूतळावरील सर्वात महत्त्वाचा घटक असून, पाण्याचे महत्त्व सर्वांनी समजवून घेण्याची गरज आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे जलस्त्रोतामध्ये विसर्जन केल्यास मोठ्या प्रमाणात जल प्रदुषण होते. हे रोखण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अंबिका बनसोडे यांनी सण-उत्सवातून पर्यावरणाला हानी पोहचणार नाही या दृष्टीने साजरे केले गेले पाहिजे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा होण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने योगदान देत असून, अनेक नागरिकांचा यामध्ये प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंचक्रोशीतील ग्रामस्थांना फाऊंडेशनच्या माध्यमातून जलकुंडात आपल्या गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आवहानाला प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थांनी जलकुंडात गणपतीचे विसर्जन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *