तांदळाच्या अक्षदेला फाटा देऊन ढोबळे व मोरे परिवाराने राबविला सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्नात तांदुळाच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्या टाकून, तांदुळाचे पोते निवासी मतीमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचारमंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे यांनी आपल्या पुतणीच्या लग्नात हा आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम राबविला.
लग्नात मंगलाष्टके सुरु असताना अक्षदा म्हणून वर्हाडी मंडळी तांदूळ उधळत असतात. यामुळे अन्न वाया जाते व पायाखाली तुडवले जाते. या प्रथेला कुठेतरी फाटा देण्यासाठी ढोबळे व मोरे परिवाराच्या सहमतीने हा उपक्रम पार पडला. मौजे करोडी (ता. पाथर्डी) येथे पूजा ढोबळे व विजय मोरे यांचा विवाह नुकताच पार पडला. या विवाहात तांदळाच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्याच्या अक्षदांची उधळण करण्यात आली. लग्नात उरलेल्या तांदळात आनखी भर घालून तांदळाचे पोते अशोक निराळे मूकबधिर विद्यालय (मोहरी) यांना मदत देण्यात आली.

गणेश ढोबळे म्हणाले की, अन्न हे पूर्णब्रह्म आहे. भुकेलेल्यांना अन्नापेक्षा कोणतेही श्रेष्ठदान नाही. परिवर्तनवादी विचाराने सामाजिक बदल घडणार असून, स्वत:पासून त्याची सुरुवात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास काही चुकीच्या प्रथांना पायबंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ढोबळे व मोरे परिवाराने समाजा समोर एक चांगला आदर्श ठेवला असून, त्याचे सर्वत्र कौतुक व चर्चा सुरु आहे.
