चप्पल शिवण्याच्या कारणावरुन झाले होते भांडण
अहमदनगर (प्रतिनिधी)- चप्पल शिवण्याच्या कारणावरुन राहुरी येथे झालेल्या भांडणात जखमी व्यक्ती मयत झाला होता. या प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
राहुरी येथील विलास नारायण कांबळे व आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे यांचे चप्पल शिवण्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. आरोपी वाघमारे याने चपलेला खिळा ठोकण्याच्या लोखंडी वस्तूने विलास कांबळे यांच्या डोक्यात व डोळ्यावर मारुन जबर जखमी केले होते. कांबळे याला ग्रामीण रुग्णालय वांबोरी येथे उपचाराकरीता दाखल केले होते. डोळ्याला जास्त मार लागल्याने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी त्यांना नोबल हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे 30 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी अटक केली. आरोपीने अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग व अॅड. अक्षय दांगट यांच्या मार्फत जामीनसाठी अर्ज केला. सदर प्रकरणात आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद करुन आरोपीची बाजू मांडली. जखमी हा उपचार घेऊन बरा झाला होता. तो आरोपीने केलेल्या मारहानीमुळे मयत झालेली नाही, अशी बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकार पक्षातर्फे आरोपीला तपास चालू असल्याने जामीन देवू नये अशी मागणी करण्यात आली. परंतू दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भाऊसाहेब किसन वाघमारे याचा जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग व अॅड. अक्षय दांगट यांनी काम पाहिले.