केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने पुरस्काराने केले सन्मानित
देशी-विदेशी चारा पिकावर केलेल्या संशोधन कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकार च्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भारतीय कृषी संशोधन संस्थानच्या माध्यमातून देण्यात येणारा राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार 2023 ने अहमदनगर जिल्ह्यातील अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी सोमेश्वर श्रीधर लवांडे यांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान प्रदर्शनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी यांच्या हस्ते लवांडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांश पाठक, भारतीय कृषी विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. ए.के. सिंग, सहसंचालक डॉ. रविंद्र पहडिवा, डॉ. नफिस अहमद आदी उपस्थित होते. लवांडे यांनी मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचालित कृषी विज्ञान केंद्र दहिगावने (ता. नेवासा) चे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांच्यासह पुरस्कार स्विकारला.
सोमेश्वर लवांडे हे फत्तेपूर (ता. नेवासा) सारख्या छोट्याश्या गावात शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले आहे. त्यांनी इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश या परदेशी जातीच्या चार वाणांची तसेच स्वदेशी सात नेपियर जातीच्या चार्याची लागवड करत संशोधन केले आहे. कमी वेळेत अधिक उत्पादन देणारे पिके आणि दूधासाठी सकस असलेला चारा पिकांचे त्यांचे प्रयोग शेतकर्यांच्या पसंतीस उतरली आहे. देशी-विदेशी चारा पिकावर त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, जिल्हा सहकारी बॅकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार सुधिर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, उदयन गडाख, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन देसाई देशमुख, संचालक शिंदे, कारखान्याचे एम.डी. अनिल शेवाळे, महाराष्ट्र राज्य आर.एस.पी. अॅण्ड सी.डी. चे नाशिक डिव्हिजनल कमांडर सिकंदर शेख यांनी लवांडे यांचे अभिनंदन केले.