अहमदनगर हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
पूर्ववैमनस्यातून दिलेल्या खोटी फिर्यादीवरुन निरापराध युवकांचे नाव गोवल्याचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा, रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक साहेबान जहागीरदार व उद्योजक पै. अफजल शेख यांचा सदर घटनेशी संबंध नसताना विनाकारण त्यांची गुन्ह्यात गोवण्यात आलेली नावे वगळण्याची मागणी अहमदनगर हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर सदर घटनेत कोणाच्या तरी सांगण्यावरुन व पूर्ववैमनस्यातून दिलेल्या खोटी फिर्यादीवरुन निरापराध मुस्लिम समाजातील युवकांचे नाव गोवल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
बुधवारी (दि.1 मार्च) हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने संबंधित पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणी म्हणणे मांडले. यावेळी गफ्फार शेख, नवीद शेख, इरफान मेमन, नदीम शेख, सरफराज कुरेशी, अज्जू खान, अशरफ सय्यद, सुलेमान रंगरेज, जिया खान, अय्युब सय्यद, फिरोज शेख, आवेज शेख, रईस तांबोळी, समीर शेख, शाकीर शेख, अबरार पठाण, सिद्दिक तांबोळी, मोहसीन शेख, रमीज शेख, मीरा रंगरेज, अलीम शेख, जुबेर कुरेशी, दानिश खान, अजीम शेख, जाकीर शिकलकर, मोहसीन शेख, कादिर शेख आदी उपस्थित होते.
शहरातील सर्जेपुरा येथील रामवाडी परिसरात सोमवारी दि.27 फेब्रुवारी रात्री वैयक्तिक भांडणातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. यामध्ये बजरंग दलाचा पदाधिकारी असलेला युवक कुणाल भंडारी हा जखमी झाला आहे. मात्र भंडारी याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कुठलिही शहानिशा न करता एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व सामाजिक कार्यात नेहमीच सातत्याने अग्रेसर राहून समाजात जातीय सलोख्याचे कार्य करणारे साहेबान जहागीरदार व उद्योजक पै. अफजल शेख यांच्याबद्दल खोटी फिर्याद देऊन त्यांचे नाव या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

साहेबान जहागीरदार व अफजल शेख हे दोन्ही मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित युवक आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शहरात निर्माण होणारे जातीय तेढ दूर करण्यासाठी समाजात नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र कुणाल भंडारी यांनी या भांडणात पूर्ववैमनस्यातून व कोणाच्या तरी सांगण्यावरुन मुस्लिम समाजातील या दोन्ही युवकांना सदर भांडणाच्या घटणेत कोणताही संबंध नसताना अडकविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
दोन्ही युवकांना या घटनेची कल्पना नसताना देखील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन निरापराध युवकांचे नाव गुन्ह्यातून वगळून न्याय मिळण्याची मागणी अहमदनगर हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.