ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने स्वागत
रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डिजीटल बसचा उपक्रम दिशादर्शक -गणेश कवडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डिजीटल बसचा उपक्रम दिशादर्शक आहे. राजकारणापलीकडे मासुम या सामाजिक संस्थेने उभे केलेले कार्य व दुर्बल घटकातील युवकांना ज्ञानातून सक्षम करण्याचे भाई सथ्था नाईट हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद आहे. देशाच्या विकासासाठी अशा सामाजिक संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती श्री.गणेश कवडे यांनी केले.
ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूल व मासूम संस्था (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने तर एकलम (ब्लू स्टार कंपनी) यांच्या सहकार्याने रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याकरिता शहरात मुंबई येथून आलेल्या फिरत्या संगणक लॅबचे (डिजीटल बस) ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी कवडे बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद (माध्यमिक) उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, जिल्हा परिषद (माध्यमिक) सहाय्यक योजना अधिकारी श्रीराम थोरात, मासूम संस्थेचे संदीप सूर्यवंशी, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, संस्थेचे उपाध्यक्ष मधुसूदन मुळे, कार्यकारणी सदस्य ज्योती कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, शालेय समिती सदस्य विलास बडवे, प्राचार्य सुनील सुसरे, सेवक प्रतिनिधी विठ्ठल उरमुडे, प्रोग्राम मॅनेजर अशोक चिंधे, प्रशिक्षक चिराग वर्मा, शाम सुंदर, संजय कुटीनो, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे, जिल्हा न्यायाधीश चंद्रचूड गोंगले आदींसह यावेळी शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व मासूम संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

कवडे पुढे म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून होतकरु युवकांच्या शिक्षणासाठी सहकार्य राहिल तसेच शहराच्या एमआयडीसी मधील औद्योगिक कंपन्यांना त्यांचा सीएसआर फंड शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याकरिता पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर यांनी तंत्रज्ञानाचा जीवनात उपयोग होण्याच्या दृष्टीने संगणकज्ञान ही काळाची गरज बनली असल्याचे स्पष्ट केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवून त्यांना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी सांगितले. श्रीराम थोरात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी डिजिटल बसचा पुरेपूर उपयोग करावा. रात्र प्रशातील विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, संगणकीय युगाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्याचे कार्य यातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष मधुसुदन मुळे यांनी कमवा व शिका या ब्रिद वाक्याप्रमाणे रात्रप्रशाळेचे विद्यार्थी दिवसा अर्थार्जन करुन रात्री शिक्षण घेतात. रात्र प्रशालेत अनेक शिक्षकांनी अल्पवेतनात योगदान देऊन शाळा उभी केली असून, मोठ्या जिद्दीने ही शिक्षणाची चळवळ सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सुमतीलाल कोठारी यांनी मासूम संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. अजित बोरा यांनी संस्थेचे रामकरण सारडा विद्यार्थीगृहातील विद्यार्थ्यांनाही संगणक प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी मासूम संस्थेच्या प्रतिनिधींकडे केली ती मान्य करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश चंद्रचूड गोंगले यांनी शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचे व मोठे आहे. समाजाच्या पायाभरणीचे काम शिक्षक करत असल्याचे सांगितले. तर शाळेस रु.10 हजार रुपयाची देणगी त्यांनी दिली.

मासूम संस्थेचे संदिप सुर्यवंशी यांनी राज्याच्या रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाबरोबरच मासूम संस्था त्यांना पायावर उभे करण्यासाठी सहकार्य करत आहे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सहकार्य करणे व उद्योग, व्यवसायासाठी देखील त्यांना मदत करण्याचे काम करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार महादेव राऊत सर यांनी मांनले. मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, प्रकल्प प्रमुख कमलाकर माने व रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात हा उपक्रम सुरु आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त रात्रशाळेच्या वतीने शिक्षण आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
फिरती संगणक लॅब (डिजीटल बस) शहरात असलेल्या तीन रात्रप्रशालेच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देणार आहे. सलग 22 दिवस संगणकाचे बेसिक प्रशिक्षण चालणार आहे. प्रोजेक्टर व वातानुकूलित असलेल्या डिजीटल बसमध्ये 14 संगणक संच असून, एका वेळी 28 विद्यार्थी बसण्याची क्षमता आहे. शंभर ते दोनशे युवक-युवतींना संगणकाचे बेसिक प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. सकाळी रात्रप्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या भागात जाऊन व संध्याकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बेसिक संगणक प्रशिक्षणाबरोबर ग्राफिक्स डिजाईन, वेब डिजाईन, डिजीटल साक्षरतेचे धडे देण्यात येणार आहे.