इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार
तमस प्रवृत्तीच्या कौरवांना कायमचे संपविण्यासाठी गीताभारताचा आग्रह
अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक जीवनात खालवत चाललेला नैतिकतेचा स्तर उंचावण्यासाठी इंडिया अगेन्ट तमस स्लेव्हरी रविवारी (दि.5 मार्च) दिल्लीगेट वेस येथे सकाळी 11 वाजता गीताभारताचा जागर करुन त्याचा स्विकार करण्याचा आग्रह धरला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा स्तर उंचावण्यासाठी गीताभारताशिवाय पर्याय नाही. गीताभारताला या देशात अडीच ते तीन हजार वर्षाची पार्श्वभूमी आहे. गीताभारत हा धर्मग्रंथ नसून, तो एक क्रांतिकारक मानसशास्त्रीय ग्रंथ आहे.गीताभारतामुळे वैयक्तिक जीवनामध्ये तमस चेतना लोप पावून, उन्नत चेतनेचा स्वीकार सहजासहजी करता येतो. त्याच वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये विशेषत: निरंतर राष्ट्रीय कर्तव्य करणे ही नागरिकांची सवय होते. राष्ट्राचे हित आणि व्यक्तीचे कर्तव्य या दोन्हींमध्ये समन्वय गीताभारतामुळे नक्कीच निर्माण करता येते. त्यामुळे देशातील घराघरात आणि जनमानसात गीताभारताचा आग्रह धरण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
इंग्रजांनी देशात दीडशे वर्षे राज्य केले. चंगळवाद हा भारतीयांनी पाश्चात्य संस्कृतीच्या अंधअनुकरणातून स्वीकारला आहे. सातत्याने भारतातील जनता परकीयांच्या गुलामगिरीत राहिल्यामुळे गीताभारतासारख्या सतत उन्नत चेतना आणि तुफानी ऊर्जा देणार्या तंत्राला परके झाले आहेत. भारताला संविधानिक लोकशाही आली, परंतु सर्वत्र सत्ताधारी हे तमस चेतनेच्या आहारी गेले आहेत आणि मतदार देखील थोडक्या पैशात विकले जातात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सामान्य माणसाला स्वातंत्र्याची फळे मिळू शकली नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीमुळे भारतात नैतिकतेचा स्तर उंचावला नाही. सर्वत्र स्वार्थ बोकाळला आहे. अशा वेळेस भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये गीताभारताला मोठे स्थान देण्याची गरज आहे. गीताभारत निर्मितीमागे राष्ट्रीय कर्तव्याबाबतची भूमिका होती. गीताभारतामध्ये हिंदुत्व प्रणाली बाबत एक शब्द देखील लिहिलेला नाही. तमस प्रवृत्तीच्या कौरवांना कायमचे संपविण्यासाठी गीताभारताचा आग्रह आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राचा आग्रह धरणार्या सध्याच्या राज्यकर्त्यांना गीताभारताबाबत कोठेही आग्रह धरला नाही, कारण सध्याचे सत्ताधार्यांची वागणे हे कौरवपक्षाशी सुसंगत असल्यामुळे गीताभारतापासून ते लांब असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
गीताभारत घरोघरी व भावी पिढीत रुजविण्यासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम प्रयत्नशील आहेत.
