रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालय विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दणाणले
एकही विद्यार्थीविना शाळा भरली, सर्व वर्ग रिकामे
नगर (प्रतिनिधी)- आपल्या लाडक्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन केले. कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांना नुकतीच शाळा सुरु होऊन काही दिवस उलटले असताना त्यांचा अचानक बदलीचा आदेश प्राप्त झाला. मात्र ही बदली विद्यार्थी, पालकांना मान्य नसून, पालक संघ समितीच्या माध्यमातून मंगळवारी (दि.1 जुलै) ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी व पालकांनी शाळेवर देखील बहिष्कार टाकल्याने शाळा भरली मात्र शाळेत एकही विद्यार्थी हजर नव्हता.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालय आमच्या मुख्याध्यापकांची बदली रद्दा करा! ही एकच मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला. तर शाळेत एकही विद्यार्थी आला नसल्याने फक्त शिक्षक वर्गात बसून होते. नेहमीच गजबजलेली शाळा विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीने सामसूम झाली होती.
लंके हे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेत कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टी, काटेकोर प्रशासनशैली, विद्यार्थ्यांप्रती कळकळ, व परिणामकारक नेतृत्वामुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव यश संपादन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबवलेले उपक्रम, मार्गदर्शन आणि कौशल्यवर्धनाच्या योजना यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमध्ये चमकले आहेत. पालकवर्गात त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट करुन संतप्त पालकांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.