कंपनीतील व्यवहारावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.20 मार्च) किरण दंडवते उर्फ चिन्या व आकाश दंडवते उर्फ चिंट्या (रा. सावेडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि.13 मार्च रोजी योगेश गलांडे व शंकर शेळके एमआयडीसी येथील भळगट कॅन्टीन येथे चहा पीत सुनील शेवाळे यांची वाट पाहत होते. यावेळी आकाश दंडवते व त्यांचा मोठा भाऊ किरण दंडवते हे दोघे बलेनो गाडीतून आले. गाडीच्या डिक्कीतून लोखंडी रॉड काढून गलांडे यांच्या जवळ आले. तर आकाश दंडवते याने हातातील लोखंडी रॉड गलांडे यांच्या डोक्यात पाठीमागून मारली. गलांडे खाली पडल्यानंतर किरण दंडवते यांनी देखील लोखंडी रॉडने हल्ला केला. गलांडे याने मारलेला रॉड डाव्या हाताने अडविला. यावेळी आकाश याने मोठ्या भावाला गलांडे यांना जीवे मारण्याची चिथावणी दिली. त्यानंतर तिथे आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागल्याने दोन्ही हल्लेखोर पसार झाले. दोन्ही भावांनी कंपनीतील व्यवहाराच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले असल्याचे गलांडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपींवर भा.द.वि. कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहे.
