जय असोसिएशन ऑफ एनजीओचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
मान्यता न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याच्या मागणीसाठी जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जय असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, उपाध्यक्ष पोपट बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे संजय भिंगारदिवे, स्वामी समर्थ महिला प्रतिष्ठानचे अॅड. सूर्यकांत गोफणे, उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, भारतीय लोकशाहीचे अध्यक्ष रावसाहेब काळे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक संस्था विविध क्षेत्रांमध्ये सेवाभाव वृत्तीने लोकसहभागातून तसेच शासनाच्या सहकार्याने कार्य करत आहेत. त्याप्रमाणे सामाजिक संस्था शासन आणि समाज यांच्या मधील दुवा म्हणून कार्य करत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका संस्था पार पाडत आहे. असे असताना संस्थांना पाहिजे तेवढं सहकार्य प्रशासकीय स्तरावरुन दिले जात नाही. पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत युवकांच्या विकासासाठी राज्यभरात युवक कल्याण योजना दरवर्षी राविण्यात येतात.

सदर योजना 25 वर्षापासून सुरू आहे. युवक कल्याण योजनेअंतर्गत सामाजिक उपक्रमासाठी एका संस्थेला मंडळाला वर्षात एकदाच 25 हजार रुपये सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद आहे. 1977 पासून आज पर्यंत सदर निधीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याची महागाई, प्रवास खर्च इतर अनुषंगीक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाही, क्रीडा विभागामार्फत सहाय्यक अनुदानात कोणतीही वाढ झालेली नाही. शासनाने संस्थांना देण्यात येणार्या सहाय्यक अनुदान वाढ करून युवक कल्याण योजना राबविण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तीन वर्षापासून युवक कल्याण योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही सामाजिक संस्थांना युवक कल्याणचा निधी देण्यात आलेला नाही. यावर्षी देखील अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्थांनी युवक कल्याण योजनेचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत. सदर प्रस्तावास पुणे येथील क्रीडा व युवक सेवासंचालनालय महाराष्ट्र शासनाने तांत्रिक मान्यता दिलेली आहे. या योजनेतंर्गत सलग तीन वर्षे निधी खर्च न झाल्यास त्या जिल्ह्याच्या या योजनेचा निधी कायमचा बंद करण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासकीय मान्यतेच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या स्वाक्षर्या आहेत.