घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान -प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख
अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्वी शिक्षक तोच असतो, जो सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत असतो. आयुष्यात त्याने घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान असतो. समाज घडविणारा शिक्षक कधीच समाजातून निवृत्त होत नाही. तो कायम समाजाला दिशा देत राहत असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख यांनी केले.
गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांचा सेवापूर्ती निमित्त पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. देशमुख बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेवापुर्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, विश्वस्त राजेंद्र म्याना, माजी मुख्याध्यापक दिपक रामदिन, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, शिक्षक प्रतिनिधी प्रा. भानुदास बेरड, उच्च माध्यमिकचे समन्वयक प्रा. उत्तम लांडगे, श्रमिक नगरच्या मुख्याध्यापिका विद्याताई दगडे आदींसह शालेय आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी उपस्थित पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी ही शुभेच्छा दिल्या. प्रमोद चन्ना यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उपस्थितांच्या हस्ते रच्चा यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, शाळेत 34 वर्षे सेवा करतांना रच्चा यांनी सुरूवातीला अध्यापक व नंतर पर्यवेक्षिका म्हणून उत्तमरित्या कामकाज पाहिले. त्या विद्यार्थी प्रिय, सेवाभावी शिक्षिका होत्या. ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी प्रामाणिक करुन अनेक विद्यार्थी घडविले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सागर रच्चा, गायत्री रच्चा, कल्यना पलगंटी व माजी विद्यार्थी राजश्री गुगळे, अभिजीत गुरप, श्रीनिवास पोन्नम तसेच इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी गौरी धामणे, रच्चा मॅडम यांनी रच्चा यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे जेष्ठ संचालक शरद क्यादर व सर्व संचालक मंडळाने पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांना सेवापुर्तीच्या शुभेच्छा देऊन शालेय उपक्रमात नेहमी योगदान देण्याचे सांगितले.

सरोजिनी रच्चा यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, शिक्षकांसाठी विद्यार्थी हेच दैवत असून, विद्या दानाने केलेली त्यांची सेवा ही खरी भक्ती आहे. किती वर्षे सेवा केली? यापेक्षा किती चांगले विद्यार्थी घडविले हे पहाणे गरजेचे आहे. 34 वर्ष सेवेत अनेक विद्यार्थी भेटतात व आपुलकिने चौकशी करतात. त्यावेळी सर्व काही मिळविल्याचा आनंद होतो. या सेवाकार्यात शिक्षक सहकारी व शिक्षकेतरांची मोलाची साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी गोसकी यांनी केले. आभार अनिता भाटिया यांनी मानले.
