संघटनेच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांना आधार देणार -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या शहराध्यक्षपदी किर्तनकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीप साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल साळवे यांचा वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी माजी तहसीलदार रोहिदास महाराज जाधव, मंदाताई साळवे आदी उपस्थित होते.
दिलीप साळवे किर्तन व प्रवचनातून समाज जागृतीचे कार्य करत आहे. तर विविध उपक्रमाद्वारे त्यांचे सामाजिक कार्य सुरु असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली.
जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. सर्वसामान्यांवर होणारा अन्यायाचा बिमोड करण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. संघटनेत सुशिक्षित व समाज कार्य करणार्यांना संधी देण्यात आलेली असून, दिलीप साळवे यांच्या माध्यमातून शहरात संघटनेचे चांगले कार्य उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी तहसीलदार रोहिदास महाराज जाधव यांनी शहरात लवकरच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना दिलीप साळवे यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेने टाकलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे. किर्तनाबरोबर समाज जागृतीचे कार्य करुन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल साळवे यांचे महाराष्ट्राचे प्रभारी वाल्मिक महाराज जाधव, नगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, महाराष्ट्राचे अध्यक्ष राम गरत, महिला जिल्हाध्यक्ष ह.भ.प. हिराताई मोकाटे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष संगिता नवले, तालुकाध्यक्ष प्रतिभा साबळे यांच्यासह महाराष्ट्र कमिटीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.