कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी
विरोधी संचालक व सभासदांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्चला आर्थिक वर्ष सपले असताना कायम ठेवेवरील व्याज सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी धरणे आंदोलन केले. तर त्वरीत सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांच्या खात्यावर लाभांश जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सत्ताधारी संचालकांच्या कारभाराचा निषेध नोंदवत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, अंबादास राजळे, सभासद महेश दरेकर, प्रसाद साठे, प्रसाद बारगजे, अर्जुन भुजबळ, संतोषकुमार ठाणगे, बाळासाहेब निवडुंगे, राहुल झावरे, संतोष कार्ले, देविदास पालवे, बद्रीनाथ शिंदे, नंदकुमार शितोळे, संभाजी गाडे, आत्माराम दहिफळे, रमाकांत दरेकर, बाळासाहेब राजळे, सुभाष भागवत, तौसिफ शेख, सुनील अकोलकर आदींसह शिक्षक सभासद सहभागी झाले होते.
मागील वर्षी 8 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी मंडळाने जाहीर सभेत सांगितले होते की, येथून पुढे दरवर्षी 1 एप्रिलला सभासदांच्या खात्यात कायम ठेव व वर्गणीवरील व्याज वर्ग केले जाईल. तसेच मे महिन्याच्या पहिल्याच आठवडयात सर्वसाधारण सभा घेतली जाईल. त्याप्रमाणे कार्यवाहीची मागणी विरोधी संचालकांनी मागील संचालक मंडळाच्या बैठकीत केली होती. परंतु अद्यापपर्यंत सदर बाबींची अंमलबजावणी न झाल्यामुळे आज धरणे आंदोलन करण्यात आले. मार्चमुळे शिक्षकांचे पगार झालेले नाही. त्यांच्याकडे असलेली रक्कम आयकर मध्ये कापण्यात आल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलमंडले असून, पैशाची नितांत गरज भासत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
15 टक्के लाभांश सभासदांना मिळावा, जमीन कर्ज मर्यादा 22 लाख रुपये करण्यात यावी, सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याजदर वाढवावा, निवृत्त संचालकाचा हस्तक्षेप व दादागिरी थांबविण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन व्हाईस चेअरमन धोंडीबा राक्षे व सचिव स्वप्निल इथापे यांना देण्यात आले. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.